
Bulli Bai App प्रकरणातील एका संशयितला मुंबई पोलिसांनी बंगळुरूमधून ताब्यात घेतलं आहे. या संशयिताला आता मुंबईला आणलं जातं आहे. त्याला अटक केलं जाण्याची शक्यता आहे. हा जो संशयित आहे तो Bulli Bai App ला फॉलो करणाऱ्या पाच जणांपैकी एक आहे त्यामुळे त्याला अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काय आहे Bulli Bai अॅप प्रकरण?
काही दिवसांपासून Sulli deals app चर्चेत आलं होतं. या अॅपप्रमाणेच आता bulli bai App च्या माध्यमातून मुस्लिम महिलांची बदनामी केली जात आहे. Sulli deals अॅप GitHub वर लाँच करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे Bulli bai अॅपही GitHub वर लाँच करण्यात आलं आहे.
Github एक होस्टिंग प्लॅटफॉर्म आहे. प्ले स्टोअरप्रमाणेच या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे अॅप उपलब्ध आहेत. गिटहब, एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म असून, अॅप बनवण्यास मदत केली जाते. यासाठी ईमेल आवश्यक असतो.
Bulli Bai अॅपवरून मुस्लिम महिलांना निशाणा बनवलं जात आहे. एका महिला पत्रकाराने ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. या महिला पत्रकाराचा फोटो या अॅपवर शेअर करण्यात आला आहे. त्या फोटोवर लोकांकडून अश्लील आणि स्त्री विरोधी प्रतिक्रिया पोस्ट करत आहेत.
Bulli Bai अॅपवर काय चालतं?
जेव्हा एखादी व्यक्ती हे अॅप सुरू करते, त्यावेळी त्या व्यक्तीला मुस्लिम महिलांचे फोटो दिसतात. हे फोटो दिसल्यानंतर यूजर्स हे फोटो Bulli Bai Of the Day अशा स्वरुपात पब्लिश करतात. त्यानंतर अश्लील आणि घृणास्पद भाषेत प्रतिक्रिया देत बोली लावली जाते. त्यानंतर #BulliBai हा हॅशटॅग वापरून ट्रेंड केलं जातं.
ट्विटर, फेसबुकसह सोशल मीडियावर प्रभावी असलेल्या 100 महिलांना या अॅपच्या माध्यमातून निशाणा बनवलं जात आहे. पत्रकारिता आणि इतर क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रभावशाली महिलांचे फोटो आणि नाव वापरून बदनामी केली जात आहे.
Bulli Bai अॅप कुणी बनवलं?
Bulli Bai अॅप नेमकं कुणी बनवलं, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. महिला पत्रकाराने या अॅपवरील स्वतःच्या फोटोचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर हे अॅप बंद करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही या अॅपबद्दल केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यावर अॅप बंद करण्यात आल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं आहे.
महिला आयोगाने घेतली दखल
संबंधित महिला पत्रकाराने याप्रकरणी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही संबंधित अॅप बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.