Gunratna Sadavarte : शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंना जामीन मंजूर

एसटीच्या ११५ कर्मचाऱ्यांनाही दिलासा
Gunratna Sadavarte : शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंना जामीन मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी मोर्चा नेत आंदोलन केलं होतं. जो राडा त्यावेळी घडला त्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ माजली होती. या प्रकरणी एसटीचे ११५ कर्मचारी आणि गुणरत्न सदावर्ते यांना मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. गुणरत्न सदावर्ते आणि या ११५ कर्मचाऱ्यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

गुणरत्न सदावर्ते
गुणरत्न सदावर्ते

शरद पवार यांच्या निवाससस्थानी जे आंदोलन झालं त्या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११५ कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. मात्र यासंदर्भातली सविस्तर ऑर्डर येण्यासाठी संध्याकाळ होऊ शकते. त्यानंतर ती जेल प्रशासनाकडे जाईल. उद्या या आरोपींची सुटका होऊ शकते. मात्र जर उद्या त्यांची सुटका झाली नाही तर मात्र ११५ जणांची सुटका होण्यासाठी सोमवार उजाडण्याची शक्यता आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी एस. टी. कर्मचाऱ्यांकडे जामीन भरण्यासाठी इतके पैसे नसल्याचं एका आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्याने सांगितलं आहे.

गुणरत्न सदावर्ते यांना या प्रकरणात जामीन मंजूर झाला असला तरीही त्यांची सुटका लगेच होण्याची चिन्हं नाहीत. कारण सदावर्ते हे सध्या कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात आहेत. गुरूवारी त्यांना कोल्हापूर कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे आणि फिर्यादींच्या वतीने वकील शिवाजीराव राणे यांनी कोर्टात बाजू मांडली. सदावर्ते यांच्या बाजून बीटर बारदेस्कर यांनी युक्तिवाद केला.

काय आहे प्रकरण?

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवारी (८ एप्रिल) संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं. अचानक सिल्व्हर ओक येथे धडकलेल्या कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चपला भिरकावल्यानं गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ८ एप्रिलच्या रात्री गुणरत्न सदावर्ते यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर रात्री त्यांना अटक करण्यात आली.

Related Stories

No stories found.