Diwali 2021 : नागपूरकरांनो, फटाके फोडण्याआधी नियम बघा; थेट गुन्हे दाखल होणार

नागपुरात ग्रीन फटाके फोडण्याची आणि विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस कठोर कारवाई करणार आहे.
Diwali 2021 : नागपूरकरांनो, फटाके फोडण्याआधी नियम बघा; थेट गुन्हे दाखल होणार
प्रातिनिधिक छायाचित्रAajTak

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नागपूर पोलिसांनी फटाके फोडण्यासंदर्भातील नियमावली तयार केली आहे. नागपूर पोलिसांनी फटाक्यांच्या विक्रीसंदर्भात आणि फटाके फोडण्यासाठी नियमावली जारी केली असून, नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हेच दाखल केले जाणार आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबद्दलची माहिती दिली.

माध्यमांशी बोलताना नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ग्रीन फटाक्यांची खरेदी-विक्री करता येणार आहे. ग्रीन फटाकेच फोडण्याची परवानगी आहे. फटाके विक्रेत्यांच्या संघटनेसोबत आमची बैठक झालेली आहे. त्यांना नियमाविरुद्ध फटाक्यांची विक्री न करण्याचं आवाहन केलेलं आहे', असं आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.

"काल शहरात मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली. काही गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. आमचं विक्रेत्यांना आवाहन आहे की त्यांनी नियमांविरुद्ध जाऊन त्यांनी विक्री करू नये. फटाके फोडण्यासाठी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेली आहे. त्यामुळे ठरवून दिलेल्या वेळे व्यतिरिक्त फटाके फोडल्यास पर्यावरण संरक्षण कायदा आणि 144 कलम लागू केलेले आहेत. त्यामुळे सीआरपीसी 188 कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जातील", असा इशारा अमितेश कुमार यांनी दिला आहे.

"या नियमांची अमलबजावणी करण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलेली आहेत. ही पथकं नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. लोकांना इतकंच आवाहन आहे की, स्वतःहून नियमांचं पालन करावं, ज्यामुळे पोलिसांना आणि नागरिकांना कोणत्याही त्रासाला सामोरं जावं लागणार नाही", असं आवाहन अमितेश कुमार यांनी नागपूरकरांना केलं आहे.

"सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि राष्ट्रीय हरित लवादानेही यासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे या नियमांचा भंग केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा आहे. जनहित आणि पर्यावरण संरक्षण लक्षात घेऊन हे आदेश काढण्यात आलेले आहेत. स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि शहराच्या हितासाठी लोक नियमांचं उल्लंघन करणार नाही, अशी आम्हाला अपेक्षा आहे", अमितेश कुमार यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in