
Kim Jong-Un: उत्तर कोरिया: एखाद्या दाम्पत्याच्या घरी जेव्हा नवा पाहुणा येतो तेव्हा त्यांची खरी लगबग असते ती त्या बाळाचं नेमकं नाव काय असावं याची. अनेक जण आपल्या बाळाचं नाव वेगळं असावं असा प्रयत्न करतात. त्यासाठी ते बरीच शक्कलही लढवतात. पण आता नवजात बालकांची नावं त्यांचे पालक नाही तर सरकारनेच ठरवली आहेत. हो.. आणि ही नावं देखील असतील बॉम्ब, बंदूक आणि सॅटेलाइट अशी... काय खरं वाटत नाही ना... पण ही बातमी अगदी अचूक आहे. (name the children bomb gun satellite governments order to parents of north korea kim jong un)
पण लागलीच घाबरुन जाऊ नका... मुलांच्या नावांबाबतचा हा फतवा भारतातील सरकारने काढलेला नाही. तर तो काढलाय. उत्तर कोरियाच्या (North Korea) सरकारने. म्हणजेच तुम्हा-आम्हाला चांगलाच माहित असलेल्या हुकूमशाह किम जोंग-उन याने.
उत्तर कोरियातील पालकांना त्यांच्या मुलांची नावे 'बॉम्ब', 'बंदूक' आणि 'सॅटेलाइट' द्यावी असं सांगण्यात आलं आहे. अशा नावांचे वर्णन 'देशभक्त' असे करण्यात आले आहे. येथील सरकारचं म्हणणं आहे की, पालकांनी त्यांच्या मुलांची नावं ही अधिक वैचारिक आणि सैन्यवादी ठेवावीत. खूप साधेपण असलेली नावं ठेवणं टाळावी.
रेडिओ फ्री एशियाच्या रिपोर्टमध्ये स्थानिक लोकांशी झालेल्या चर्चेच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी, उत्तर कोरियाच्या सरकारने आपल्या नागरिकांना दक्षिण कोरियाच्या नावांसारखी अधिक प्रेमळ (Lovable) नावं जसं की, A Ri (प्रेम करणारा) आणि Su Mi (खूप सुंदर), वापरण्याची परवानगी दिली होती. पण आता सरकारकडून असा आदेश देण्यात आला आहे की, अशा प्रकारची नावे असलेल्यांना अधिक देशभक्तीपर आणि वैचारिक नावे ठेवावी लागतील. असे न करणाऱ्यांना दंड आकारण्यात येईल.
नकार देणाऱ्यांना दंड
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उन (Kim Jong-Un) याला असं वाटतं की, उत्तर कोरियातील नागरिकांनी त्यांच्या मुलांची नावं Pok Il (बॉम्ब), Chung Sim (निष्ठा) आणि Ui Song (उपग्रह) या धर्तीवर ठेवायची आहेत. जर एखाद्या व्यक्तीने तसे करण्यास नकार दिला तर त्याला दंड ठोठावला पाहिजे आणि 'समाज-विरोधी' घोषित केले पाहिजे.
या आदेशाचे पालन करण्यासाठी गेल्या महिन्यापासून देशभरातील लोकांना नोटीस बजावल्या जात आहेत. नाव दुरुस्त करण्यासाठी त्यांच्याकडे या वर्षाच्या अखेरपर्यंत मुदत आहे. लोकांना सांगण्यात आले आहे की, क्रांतिकारक मानकांची पूर्तता करण्यासाठी, त्यांच्या नावांमध्ये राजकीय अर्थ असणे आवश्यक आहे.
मात्र, या आदेशामुळे अनेक पालक नाराज झाले आहेत. अनेक जण आपली किंवा आपल्या मुलांची नावं बदलण्यास टाळाटाळ करत आहेत. एखाद्या व्यक्तीला त्याचे नाव निश्चित करण्याचे स्वातंत्र्य नाकारता येणार नाही, असं अनेकांचं म्हणणं आहे.
मात्र, असं असलं तरी ते किम जोंग-उनचा आदेश धुडकावून लावतील असं होण्याची शक्यता कमीच आहे. कारण किमचा कोणताही आदेश धुडकावला तर तो त्या व्यक्तीचे काय हाल करतो हे उत्तर कोरियन नागरिकांना चांगलंच ठावूक आहे. अशावेळी नाइलाजास्तव अनेक जणांना आपलं नाव बंदूक किंवा बॉम्ब ठेवावं लागणार आहे एवढं मात्र निश्चित...