शेंबडा आमदार म्हणत नारायण राणेंची टीका; केसरकरांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांच्यात पुन्हा एकदा वाक् युद्धाची ठिणगी पडली. सावंतवाडीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणे यांनी दीपक केसरकरांना शेंबडा आमदार म्हणत लक्ष्य केलं. त्यानंतर दीपक केसरकरांनीही राणे यांना चोख प्रत्युत्तर दिलं.

नारायण राणे काय म्हणाले?

सावंतवाडी येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नारायण राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला. “सरकारकडे रस्त्यांसाठीही पैसे नाहीत. आता 2000 कोटींचा प्रकल्प येतोय. कोण आणतोय उद्धव ठाकरे का सुभाष देसाई? का हा केसरकर? काय औकात आहे? कसला शेंबडा आमदार निवडून देता. विधानसभेत साधं बोलता येत नाही.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“सभागृहात एकदा मी त्यांना प्रश्न विचारला होता. त्यांनी कागद शोधण्यात बराच वेळ घालवला. चष्मा नाकाच्या टोकापर्यंत आला होता. पडायचाच बाकी होता. मग उत्तर द्यायला लागला. मला दया आली. मी म्हणालो, तुम्ही बसा, मला उत्तर नकोय. त्यांनाही खाली बसण्यास सांगितलं.”

“मी आमदार आणि मंत्री असताना विधानसभेत जे काम केले त्याची दखल आजही विधानभवनात घेतात. मी विधानसभा गदागदा हलवून सोडली. मात्र हे तुमचे पिल्लू काहीच करत नाही”, अशी टीका राणे यांनी केसरकरांवर केली.

ADVERTISEMENT

“राणेंचं सिंहासन मी हलवलं, ती राणेंच्या मनात सल”; केसरकरांचं प्रत्युत्तर

ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या टीकेला सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं. “नारायण राणेंचं सिंहासन मी हलवलं आहे, याची कायम सल त्यांच्या मनात आहे. त्यामुळे ते सावंतवाडीत येऊन माझ्यावर टीका करतात. माझ्यावर टीका केल्याशिवाय सावंतवाडीत त्यांचं राजकारण चालत नाही”, असं केसरकर म्हणाले.

“मी ज्यावेळी बोलतो, तेव्हा काय होतं हे तुम्हाला माहिती आहे. तुमचं सिंहासन कोणामुळे हललं हे तुम्हाला (नारायण राणे) माहिती आहे. त्याचीच सल तुमच्या मनात आहे, हे मला माहिती आहे.”

“विधान परिषदेत जे जे घडलं ते रेकॉर्डेड आहे. पाच वर्षे मी राज्याचा अर्थसंकल्प विधान परिषदेत सादर केला. विरोधकांच्या प्रश्नांना इतकी समर्पक उत्तरं दिली की, कधीही राईट टू रिप्लाय त्यांना पुन्हा वापरावा लागला नाही. अभ्यास पूर्ण काम केलं, पण त्याचा गवगवा कधी केला नाही. त्यामुळे ज्या जनतेनं तुम्हाला एवढी वर्ष प्रेम दिलं त्यांच्याशी खरं बोलण्याचं तरी सौजन्य दाखवा”, असा पलटवार केसरकर यांनी राणेंवर केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT