...अन्यथा बाळासाहेबांना कसं छळलं, ते सांगावं लागेल; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर 'प्रहार'

'हार आणि प्रहार' : नारायण राणे यांचं उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाला उत्तर; दिला गर्भित इशारा
...अन्यथा बाळासाहेबांना कसं छळलं, ते सांगावं लागेल; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर 'प्रहार'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे.twitter

मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर दसऱ्या मेळाव्यातील भाषणावरून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी जोरदार 'प्रहार' केला आहे. राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानांवर बोट ठेवत प्रत्युत्तर दिलं आहे. बाळासाहेबांना हयात असताना छळण्याचे काम तुम्ही कसं केलं, ते सांगावं लागेल', असा इशाराच राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

'हार आणि प्रहार'मध्ये काय म्हणाले नारायण राणे?

'मेळाव्याच्या सुरुवातीला शस्त्रपूजेनंतर उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर पुढे येऊन हातातील ओंजळभर फुले समोर उपस्थित शिवसैनिकांवर उधळली. उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मूर्ख समजतात काय? त्यांनी उधळलेल्या फुलांची एक-एक पाकळी शिवसैनिकांनी घरातल्या कपाटात नेऊन ठेवली, तर ती धनलक्ष्मी होणार आहे काय? त्यातून शिवसैनिकांचा संसार चालून उदरनिर्वाह होणार आहे काय?'

'मागच्या दोन वर्षात त्यांनी शिवसैनिकांच्या नोकरी-धंद्याचा, पोटा-पाण्याचा प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न केला काय? शिवसैनिक या मानवी रुपातील शस्त्राला अन्न, वस्त्र आणि निवारा मिळवण्यासाठी काय केले? या दोन वर्षांत शिवसैनिकांच्या हातावर तुम्ही काय ठेवलं?'

'शिवसैनिकांना नोकरी-धंदा दिला साहेबांनी! साहेबांना जे जमले ते तुम्हाला नाही जमायचं. जाहीर भाषणामध्ये क्षणोक्षणी साहेबांचे नाव घेऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. अन्यथा ते हयात असताना त्यांना छळण्याचे काम तुम्ही कसं केलं, ते सांगावं लागेल', असा गर्भित इशारा राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाला उत्तर देणाऱ्या लेखात दिला आहे.

'शिवसेना पुळचट, घाबरट लोकांमुळे वाढली नाही'

'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कुणावर आसूड ओढणार.., असा उल्लेख सामनामध्ये आला आहे. त्यांचे कुणाशी वैमनस्य आहे? सांगावे की! महाराष्ट्राच्या जनतेवर आसुड ओढणार का? हिंमत असेल, तर अंगावर या, ही डरकाळी आहे का? डरकाळी कुणी द्यावी? कुणाच्या जीवावर?'

'भाषण करताना हात वर करून आव आणणं वेगळं आणि अंगावर आलेल्यांना समोरून जबाब देणं वेगळं. शिवसैनिकांच्या ताकदीवर आणि हिंमतीवर शिवसेना वाढली. नवीन आलेल्या पुळचट, घाबरट लोकांमुळे शिवसेना वाढली नाही. कुणाच्या गालाला पाच बोटं सुद्धा न लावणारे, हिंमत असेल, तर अंगावर या म्हणतात, यापेक्षा मोठा विनोद कोणता?', असा टोला राणे यांनी उद्धव ठाकरेंना नामोल्लेख टाळत लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in