
नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळाव्यातील आपल्या भाषणात मशिदीवरील भोंगे सुरु झाल्यास त्याच्यासमोर दुप्पट स्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसा लावायची असं वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लाऊड स्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसा लावण्यात आले होते. यानंतर आता नाशिकचे पोलीस आयुक्त (Nashik Police Commissioner) दीपक पांडेय (Deepak Pandey)यांनी मात्र, नियमभंग करणाऱ्यांना सज्जड दमच भरला आहे.
'आम्ही लाऊड स्पीकर आणि डीजे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. कोणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये', असं म्हणत दीपक पांडेय यांनी डीजे आणि लाऊड स्पीकरला बंदी घातली आहे.
नेमका आदेश काय?
'आम्ही सर्व लाऊडस्पीकर आणि डीजे बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही. कोणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. आम्ही राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करत आहोत.' असं नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी म्हटलं आहे.
नाशिकच्या भद्रकाली परिसरात मनसेकडून भोंगे लावून त्यावर हनुमान चालीस लावण्यात आलं. तसेच नाशिकमध्ये इतरत्र ठिकाणी देखील भोंगे लावण्याचे नियोजन मनसेकडून करण्यात आलं होतं. या सगळ्या प्रकारामुळे कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त यांनी आता डीजे आणि लाऊडस्पीकर बंदीचा आदेश काढला आहे.
मशिदींवरील भोग्यांबाबत काय म्हणाले होते राज ठाकरे?
'माझी पंतप्रधानांना विनंती आहे. ईडीच्या, आयकरच्या धाडी टाकत आहात ना... आमच्या पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे सोर्स आहे. झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांमध्ये एकदा धाडी टाका. तुम्हाला काय काय हाताला लागेल, ते कळेल. आपल्याला पाकिस्तानची गरजच नाही. कशाला हवाय पाकिस्तान?'
'उद्या जर काही घडलं, तर आतलं आवरता आवरता नाकीनऊ येतील इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत. आमचं लक्ष नाहीये. आम्हाला मतं हवीत. आम्हीच त्या झोपडपट्ट्या, मदरसे वाढवत आहोत."
'अनेक मदरसे असे आहेत की जिथे काय घडतंय, तेच समजत नाही. ही सगळी पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आलेली आणि आपल्या लोकांनी स्वीकारलेली ही लोकं आहेत. नगरसेवक, आमदार, खासदारांना याच्याशी काही घेणंदेणं नाही. ते कशात लागले, आधार-रेशन कार्ड घेऊन जा आणि आमचीच मार. त्यांना सगळ्या गोष्टी पुरवणारे आमचेच.'
'एक दिवस असा येईल की त्यावेळी सगळ्यांचे डोळे उघडतील. काय करून ठेवलं म्हणून. एकदा पोलिसांशी बोलून बघा. कानोसा घ्या. तुम्हाला धडकी भरेल. आमचं कुणाचं लक्ष नाही.'
'मशिदीवर लागणारे भोंगे खाली उतरवावे लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर आज आणि आता सांगतोय, ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील. त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायची.'
'मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. आमचा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. ज्याप्रकारे स्पीकरचा सकाळ पाच वाजल्यापासून त्रास होतो. धर्म बनला तेव्हा लाऊड स्पीकर होता का? बाहेरच्या देशात बघा. कुठेही लाऊडस्पीकर दिसणार नाही. प्रार्थना घरात करा. प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवला पाहिजे. आमच्याकडं मंदिर आहेत. टाका धाडी. काय मिळणार घंटा. आमच्याकडे काहीच नाही.' असं म्हणत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेतला आहे.