
Uddhav thackeray Matoshree : नवनीत राणा आणि रवि राणा यांनी सकाळी नऊ वाजता मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, नऊ वाजताच राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर गर्दी केलेले शिवसैनिक बॅरिकेट्स तोडून इमारतीत घुसले आहेत. शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठणाच्या भूमिकेवर राणा दाम्पत्य ठाम असून, मुख्यमंत्र्यांना दिलेलं आव्हान पुर्ण करणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे शिवसैनिका राणा दाम्पत्यांविरोधात आक्रमक झालेले आहेत. शुक्रवारी सकाळपासून पोलिसांबरोबरच शिवसैनिकही मातोश्री बाहेर पहारा देत आहेत.
नवनीत राणा आणि रवि राणा मातोश्री येथे जाण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती मिळत असून, सध्या शिवसैनिकांनी मातोश्री बरोबरच राणा यांच्या खार येथील बंगल्या बाहेरही गर्दी केली. गर्दी वाढत असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
राणांच्या घराबाहेर मध्यरात्री शिवसैनिकांची घोषणाबाजी
मातोश्री बाहेर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं दिसत आहे. शुक्रवारी दिवसभर हाय व्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर मध्यरात्री शिवसैनिकांनी राणांच्या घराबाहेर घोषणाबाजी केली.
शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता शिवसैनिकांनी नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या घराबाहेर गर्दी केली. खार येथील घराबाहेर जाम झालेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव राणांच्या घराकडे जाणारे रस्ते बंद केले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे.
'उद्धव ठाकरेंचा पोलिसांवर विश्वास नाही का?'
दरम्यान, राणा दाम्पत्याने दिलेला इशारा आणि मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी केलेली गर्दी यावरून भाजपने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे राज्याचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
"राज्यात कायदा सुव्यवस्थेचे उघडपणे धिंडवडे निघतायेत. ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांची पोलिसांच्या उपस्थितीतच दादागिरी चालू आहे. राणा दाम्पत्याला विरोध करण्यासाठी शिवसेनेचे खासदार आमदार नेतेमंडळी शिवसैनिक मातोश्रीवर जमले आहे."
"राज्यातील गृहखात्यावर, पोलिसांवर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास नाही का? असं असेल तर तात्काळ गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी त्यांच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं? भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर भ्याड हल्ला झाला, तो दहशत निर्माण करण्यासाठी होता. या अशा हल्ल्यांना भाजपा घाबरत नाही," असं उपाध्ये यांनी म्हणाले.
शिवसेना-युवा सेनेचा इशारा
नवनीत राणा आणि रवि राणा यांनी खुलं आव्हान दिलेलं आहे. तर शिवसेनेकडून जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि युवा सेना यांनी अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
शिवसेना आणि युवा सेना यांच्या तर्फे महाप्रसाद वाटप शनिवार दिनांक २३ एप्रिल २०२२ मातोश्री बाहेर, मुंबई अशा स्वरूपात शिवसेनेनं अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.