‘उडता पंजाब’ नंतर ‘उडता महाराष्ट्र’ करण्याचा कट होता; नवाब मलिक यांचा आरोप

नवाब मलिक यांनी आणखी काय काय आरोप केले आहेत जाणून घ्या
‘उडता पंजाब’ नंतर ‘उडता महाराष्ट्र’ करण्याचा कट होता; नवाब मलिक यांचा आरोप
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक.

समीर वानखेडे हा खोटारडा माणूस आहे. ड्रग्ज पेडलर्सना अभय देणं आणि ट्रॅपमध्ये हायप्रोफाईल लोकांना अडकवणं आणि त्यांच्याकडून खंडणी गोळा करणं हा समीर वानखेडेंचा उद्योग आहे. माझा लढा एनसीबीविरोधात नाही. माझा लढा भाजपविरोधात नाही. माझा लढा या माणसाविरोधात आहे. अस्लम शेख यांनाही पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. काशिफ खान हा अस्लम शेख यांना पार्टीत येण्यासाठी आग्रह करत होता. उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र करण्याचा कट होता असा आरोप आज नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून दिली आहे.

शाहरुख खानलाही समीर वानखेडेंनी धमकावलं होतं. नवाब मलिकांनी बोलणं थांबवलं नाही तर तुझा मुलगा दीर्घ काळ तुरुंगात राहिल या आशयाची धमकी समीर वानखेडेंनी दिली होती असाही आरोप आज नवाब मलिकांनी केला आहे. या पार्टीला अस्लम शेख यांना काशिफ खान का घेऊन जाणार होता? मंत्र्यांच्या मुलांना का ट्रॅप करत होता? कट रचून ड्रग्जचा खेळ सरकार चालवत आहे अशी बदनामी करण्याचा हा डाव होता, असा दावा करतानाच अस्लम शेखही हे सुद्धा या प्रकरणाची माहिती देतीलच. आता या प्रकरणाची मुंबईच्या एसआयटीनेही चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. हे मोठं प्रकरण आहे. त्यात पडू नये म्हणजे? एक नागरीक म्हणून सत्य बाहेर आणणं ही माझी जबाबदारी आहे, असंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक.
आर्यन खानचं अपहरण करून 25 कोटींच्या खंडणीचा मोहीत कंबोजचा खेळ एका सेल्फीने बिघडवला-नवाब मलिक

एनसीबीच्या चांडाळ चौकडीला हाकला

कोणत्याही नेत्यावर आम्ही आरोप करत नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील ही लढाई नाही. तर एनसीबीत जी चांडाळ चौकडी बसली आहे त्यांना एक्सपोज करत आहोत. या चांडाळ चौकडीला बाहेर ठेवा, त्यांच्यामुळे डिपार्टमेंटची बदनामी होत आहे. यांची चौकशी करा. लॉजिकल एंडपर्यंत प्रकरण न्या, अशी आमची वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे. तुमची बदनामी करू नका. देशाला नशामुक्त करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं आवाहन त्यांनी केलं. ड्रग्जची साफसफाई झाली पाहिजे. पण ही चांडाळ चौकडी राहिली तर साफसफाई होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in