
राजकारणात आता माणुसकी शिल्लकच राहिली नाही. एक काळ असा होता की राजकारण कितीही केलं तरीही माणुसकी शिल्लक होती. मात्र केंद्र सरकारने ती पूर्णपणे संपवून टाकली आहे असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले आहेत.
आज जो बंद पुकारण्यात आला आहे तो ज्या शेतकऱ्यांचा खून त्या मुलाने केला त्याविरोधात आम्ही बंद पुकारला आहे. आजही तो व्हीडिओ पाहिला की अंगावर काटा येतो. तळपायाची आग मस्तकाला जाते की इतकं क्रूरपणे निष्पाप शेतकऱ्यांसोबत कुणी कसं वागू शकतं? लखीमपूर खिरी मध्ये घडलेली घटना ही क्रूर आहे. या प्रकरणात त्या मुलाला शिक्षा झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे त्यामुळेच आम्ही बंद पुकारला आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांनी या सगळ्या घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. कुणीही तो व्हीडिओ बघा त्यात माणुसकीचा लवलेशही नाही. माणुसकीचा कोणताच धर्म हे सांगत नाही की तुम्ही कुणाला तरी चिरडून टाका. कुणीही हा व्हीडिओ पाहिला तरीही जे घडलं ते चुकीचं घडलं हेच ती व्यक्त म्हणेल. सरकार कुणाचंही असू देत जी बाब उत्तर प्रदेशात घडली ती निंदाजनकच आहे असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. आता ही जबाबदारी केंद्राची आहे की त्यांनी देशातल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना न्याय दिला पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
काल मध्यरात्रीपासून आज सकाळी पहाटेच्या दरम्यान बेस्ट च्या ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की यामागे नेमकं कोण आहे ते शोधावं लागेल. जयंत पाटील यांनीही तसंच स्पष्ट केलं आहे. आम्हीच आमच्या बसेस का फोडू? आम्ही आंदोलन करत आहोत मात्र या बसेस आमच्या आंदोलकांनी फोडलेल्या नाहीत असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.