'मोदींच्या हातात जनतेने दिलाय काकडा, अन...' राष्ट्रवादीचं पुण्यातलं पोस्टर चर्चेत

'मोदींच्या हातात जनतेने दिलाय काकडा, अन...'  राष्ट्रवादीचं पुण्यातलं पोस्टर चर्चेत

मोदी सरकारने दिवाळीच्या आदल्यादिवशी पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीवरच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे पाच रूपये आणि दहा रूपये अशी कपात केली. असं असलं तरीही पेट्रोलचे कालचे दर हे अनेक ठिकाणी 115, 118 असेच होते. त्यानंतर आता आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झालेली पाहण्यास मिळते आहे. मात्र जे दर वाढलेले आहेत त्याला अनुसरून राष्ट्रवादीने पुण्यात लावलेलं एक पोस्टर चर्चेचा विषय ठरतं आहे..

काय आहे या पोस्टरमध्ये?

पेट्रोलचा पाईप काकड्याच्या आकारात काढण्यात आला आहे. त्यावर संदेश लिहिण्यात आला आहे. हा संदेशही खास आहे. मोदींच्या हातात जनतेने दिलाय काकडा, अन दिवाळीत काढलाय पेट्रोलनं 115 चा आकडा #ThankyouModiji असं हॅशटॅग देत राष्ट्रवादी काँग्रेसने हे पोस्टर लावलं आहे. या पोस्टवर इतर फटाक्यांचीही चित्र काढण्यात आली आहेत.

अलिकडच्या काही महिन्यांमध्ये जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. परिणामी, अलिकडच्या आठवड्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या देशांतर्गत किंमतीमध्ये महागाईचा दबाव वाढला होता. जगाने सर्व प्रकारच्या ऊर्जेची कमतरता आणि वाढलेली किंमत देखील पाहिली आहे. देशात ऊर्जेचा तुटवडा भासणार नाही आणि पेट्रोल आणि डिझेल यासारख्या वस्तू आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत याची खात्री करण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले आहेत. त्यानंतर उत्पादन शुक्ल कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने पोस्टर लावून मोदी सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किंमती प्रति लिटर (3 नोव्हेंबर)

अहमदनगर- 116.06 रूपये

अमरावती- 116.96 रूपये

औरंगाबाद-117.37 रूपये

भंडारा-116.21 रूपये

चंद्रपूर- 116.65 रूपये

गडचिरोली-117.39 रूपये

मुंबई- 115.85 रूपये

नागपूर-115.65 रूपये

नांदेड-118.63 रूपये

परभणी-118.16 रूपये

यवतमाळ-117.18 रूपये

ठाणे-115.69 रूपये

आपण जर यावर नजर मारली तर लक्षात येतं की कालपर्यंत म्हणजेच 3 नोव्हेंबरपर्यंत देशातल्या अनेक शहरांमध्ये, राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 115 आणि त्यापुढेही गेले आहेत. अशात महाराष्ट्रातही पेट्रोलच्या दरांनी 115 चा दर ओलांडला आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर आणि मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर 25-30 रूपयांनी कमी केले असते तर त्यांचं मोठं मन दिसलं असतं. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवून बेहिशोबी पैसे केंद्र सरकारने कमावले आहेत अशी टीका आता संजय राऊत यांनी केली आहे. तसंच दिवाळी साजरी करावी असं वातावरण देशात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात चांगलं वातावरण निर्माण केलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर पाच-दहा रूपयांनी कमी करून काही होणार नाही. देशभरात दिवाळीचं वातावरण नाही. भाजपला पूर्णपणे हरवावं लागणार आहे असंही संजय राऊत म्हणाले. तसंच पोट निवडणुकीत फटका बसल्याने भाजपने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in