'काही लोकांना सत्ता गेल्याने करमत नाही, अनिल देशमुखांच्या त्रासाचा एक-एक मिनिट वसूल करू', पवार बरसले

Sharad Pawar Criticized BJP: नागपूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी अनिल देशमुखांच्या मुद्द्यावरुन भाजपवर जोरदार टीका केली आहे.
'काही लोकांना सत्ता गेल्याने करमत नाही, अनिल देशमुखांच्या त्रासाचा एक-एक मिनिट वसूल करू', पवार बरसले
ncp sharad pawar nagpur tour criticized bjp devendra fadnavis on anil deshmukh ed arrest parambir singh(फाइल फोटो)

योगेश पांडे, नागपूर

'काही लोकांना सत्ता गेल्याने करमत नाही. अनिल देशमुखांची वस्तुस्थिती मला माहिती आहे. काय घडलं ते त्यांनी मला सांगितलं होतं. मला विश्वास आहे की, अनिल देशमुख (Anil Deshmukh) परत येतील, त्यांच्या त्रासाचा एक-एक मिनिट वसूल केला जाईल.' अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर टीका केलीए.

'अनिल देशमुख यांची वस्तुस्थिती मला माहित आहे. काय घडले ते त्यांनी मला सांगितलं होतं. मात्र, ज्यांनी आरोप केले ते फरार आहे व अनिल देशमुख आतमध्ये आहे.' असं म्हणत शरद पवार यांनी नागपूर दौऱ्यावर अनिल देशमुखांची आठवण काढली. 'अनिल देशमुख यांना जो त्रास दिला जातोय त्यांचा या त्रासाचा एक-एक मिनिट वसूल केला जाईल, ते पुन्हा सक्रिय होतील.' असंही पवार यावेळी म्हणाले.

'राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर माझ्या आयुष्यातला हा पहिला दिवस आहे की, मी नागपूरला आलो व अनिल देशमुख माझ्यासोबत नाहीत. अनिल देशमुख यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीला सक्षमपणे हाताळलं. मात्र, काही लोक केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करत आहे. काही लोकांना सत्ता गेल्याने करमत नाही. त्यामुळे दिल्लीच्या मदतीने इथलं राज्य कसं घालवता येईल यासाठी अखंड प्रयत्न काही लोकांनी सुरु केले आहेत.''

'सत्ता आली तर पाय जमिनीवर ठेवायचे असतात. ज्याच्या डोक्यात सत्ता गेली, पाय जमिनीवर नसले की त्यांची सत्ता गेल्यावर ते अस्वस्थ होतात. मिळालेली सत्ता सन्मानाने वापरायची हे त्यांना मान्य नाही.' असं म्हणत पवारांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

पाहा शरद पवार नागपुरात नेमकं काय म्हणाले

नागपूरमध्ये शरद पवार यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं की, 'आता आपण अनिल देशमुखांचेच प्रकरण बघा. ज्या अधिकाऱ्याने आरोप केले आहेत तोच अधिकारी स्वत: फरार झाला आहे. कुठे गायब आहे माहीत नाही, कोणत्या देशात आहे माहीत नाही. समन्स बजावलं तर हजर होत नाही. अनिल देशमुख आज तुरुंगात आहेत. याचे प्रमुख कारण केंद्रातील सत्तेचा गैरवापर केला आहे.'

यावेळी पवारांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांना जोरदार टोमणाही लगावला. 'सत्ता गेल्याने काही लोक अस्वस्थ झाले आहेत त्यांना करमत नाही. ते रोज केंद्राकडे याद्या पाठवून त्यांची चौकशी करण्याची मागणी करतात.' असं म्हणत पवारांनी राज्यातील भाजप नेत्यांवर टीका केली.

ncp sharad pawar nagpur tour criticized bjp devendra fadnavis on anil deshmukh ed arrest parambir singh
केंद्रीय यंत्रणांच्या नैराश्यातून अनिल देशमुख यांच्यावर कारवाई, आम्हाला चिंता नाही-शरद पवार

शरद पवार पुढे म्हणाले, 'एकनाथ खडसे भाजपमध्ये होते. नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ईडीने बोलावले. गुन्हे दाखल करण्यात आले. हे लोक शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात काहीही करू शकले नाहीत, म्हणून ईडीने त्यांच्या पत्नीला बोलावून, त्यांचा जबाब घेतला आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला.'

'अजितदादांच्या विरोधात काहीही करता आलं नाही. त्यामुळे राज्य सरकार सातत्याने अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही छापे टाकण्यात आले, मात्र काहीही सापडले नाही. अशी किती उदाहरणे मी आपल्याला सांगू, त्यांना (भाजप) महाराष्ट्रातील सत्ता गेल्याचं अद्यापही सहन होत नाहीए.' अशा शब्दात शरद पवारांनी फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांच्यावरच टीकेची झोड उठवली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in