'BJP कार्यकर्त्यांनी मारहाण केली, शिव्या दिल्या' महिला सरपंचाचा व्हीडिओ रूपाली चाकणकरांनी केला पोस्ट

जाणून घ्या काय आहे हे संपूर्ण प्रकरण? रूपाली चाकणकरांनी काय मागणी केली आहे?
'BJP कार्यकर्त्यांनी मारहाण केली, शिव्या दिल्या' महिला सरपंचाचा व्हीडिओ रूपाली चाकणकरांनी केला पोस्ट

भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आणि शिव्या दिल्याचा आरोप उक्कडगावाच्या महिला सरपंचाचा व्हीडिओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ट्विट केला आहे. या व्हीडिओमध्ये उक्कडगावाच्या महिला सरपंच त्यांना ग्रामसभेत आलेला अनुभव सांगत आहेत. एवढंच नाही तर न्याय मिळाला पाहिजे अशीही मागणी या सरपंच करत आहेत. पोलीस अपेक्षित सहकार्य करत नसल्याचाही आरोप या महिला सरपंचाने केला आहे.

काय म्हटलं आहे रूपाली चाकणकर यांनी?

उक्कडगावच्या एका महिला सरपंचाला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण आणि अत्यंत खालच्या पातळीच्या शिव्या दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. मी स्वतः नगर पोलीस आयुक्तांशी बोलले आहे.आरोपींवर कडक कारवाई व्हावी, या गुंडशाहीचा धुडगूस थांबवावा. असं ट्विट रूपाली चाकणकर यांनी केलं आहे. त्यानंतर या महिला सरपंचाचा व्हीडिओ ट्विट केला आहे.

काय आहे प्रकरण?

नगर जिल्ह्यातील उक्कडगावमध्ये राणी मच्छिंद्र काथोरे या सरपंच आहेत. बुधवार 8 सप्टेंबर रोजी त्यांनी तंटामुक्ती अध्यक्ष निवडताना ग्रामपंचायचीमध्ये गोंधळ झाला आणि त्यातून विरोधी पक्षाच्या लोकांनी गुंडांकरवी आपल्याला त्रास दिल्याचा आरोप राणी काथोरे यांनी आपल्या व्हीडिओमध्ये केला आहे. त्या म्हणतात, 'ग्रामसभा सुरू असताना तंटामुक्तीचा अध्य निवडला. समोरच्या पक्षाला त्याची निवड मान्य नव्हती. त्यांनी तिथे आरडाओरडा केला. मी ग्रामसभा तहकूब करून त्यांना अर्ध्या तासाचा वेळ दिला. बहुमताने आपण अध्यक्ष निवडू, असं सांगितलं. पण भाजपच्या कार्यकर्त्यांना हा प्रस्तावही मान्य झाला नाही यानंतर त्यांचा आराडाओरडा आणि गदारोळ वाढला.' असं राणी काथोरे यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

ग्रामसभेमध्ये आरडाओरडा झाल्यानंतर जेव्हा राणी कथोरे कार्यालयाकडे निघाल्या, तेव्हा भाजपच्या गुंडांनी मागून लाथ मारल्याचा दावा राणी काथोरे यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये केला आहे. मी कार्यालयाकडे जात होते, त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी लाथ मारली, शिव्या दिल्या. लाज वाटेल असं वर्तनही त्यांनी माझ्यासोबत केलं. जे लोक मला सोडवायला आले होते त्यांनाही या सगळ्यांनी मारहाण केली. त्यानंतर या सगळं प्रकरण घेऊन मी पोलिसात गेले मात्र पोलिसांनीही माझी दखल घेतली नाही असाही आरोप राणी काथोरे यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in