नितीन गडकरी म्हणतात, ‘जे मुख्यमंत्री झाले तेही दुःखी, कारण…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा स्वः पक्षातील नेत्यांचे कान टोचले आहेत. राजस्थानमधील जयपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी मंत्री आणि मुख्यमंत्री पदाची महत्त्वकांक्षा असलेल्या नेत्यांना टोला लगावला आहे.

गुजरातमध्ये भाजपने मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलल्याची चर्चा असतानाच नितीन गडकरींनी केलेल्या विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. जयपूर मतदारसंघात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, ‘मला एका पत्रकाराने विचारलं की आपण इतकं आनंदी कसं राहता? मी त्यांना म्हणालो, मी भविष्याची चिंता करत नाही. जो भविष्याची चिंता करत नाही, तो आनंदी राहतो. एकदिवसीय क्रिकेटप्रमाणे खेळत राहायचं. मी सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांना षटकार मारण्याच्या कौशल्याबद्दल विचारलं होतं. तर ते म्हणाले हे एक स्किल आहे. त्याचप्रमाणे राजकारणही एक स्किल आहे’, असं गडकरी यांनी सांगितलं.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, ‘आजकाल प्रत्येकाला समस्या आहेत. प्रत्येकजण दुःखी आहे. आमदार यामुळे दुःखी आहेत, कारण तो मंत्री होऊ शकला नाही. चांगलं खातं मिळालं नाही, म्हणून मंत्री दुःखी आहे. ज्यांना चांगलं खातं मिळालं, ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत म्हणून दुःखी आहेत. जे मुख्यमंत्री बनले, ते यामुळे दुःखी आहेत कारण कधीपर्यंत राहणार आणि कधी जाणार यांचा भरोसा नाही’, असं म्हणत नितीन गडकरी यांनी पक्षातील बदलांवर मार्मिक भाष्य केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘सत्तेत येऊनही विरोधकांच्या भूमिकेत’

गडकरींनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्षांचंही उदाहरण दिलं. ते म्हणाले, ‘अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना वाटरगेड प्रकरणानंतर पद सोडावं लागलं. अध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांना लोकांनी कॉलनीत राहण्यासाठी घरंही दिलं नाही. त्यावर निक्सननं लिहिलं होतं की, माणूस पराभूत झाल्यानं संपत नाही. लढला नाही, तर संपतो. आपल्याला आयुष्यभर लढायचं आहे.’

ADVERTISEMENT

‘कधी कधी आपण सत्तेत असतो. कधी विरोधी बाकांवर. हे चालूच राहतं. पण जे जास्त काळ विरोधी पक्षात राहतात, ते सत्तेत आल्यानंतरही विरोधकांसारखंच वागत राहतात. दुसरीकडे जास्त काळ सत्तेत राहणारे विरोधी बाकांवर गेल्यानंतरही सत्ताधारी असल्यासारखा रुबाब दाखवतात. या सगळ्याची सवय होत असते’, असंही गडकरी यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT