Exclusive Interview: 'बाबासाहेब पुरंदरेंशी एका शब्दानेही कधी चर्चा झाली नाही', जेम्स लेनचा मोठा खुलासा

Shivaji: Hindu King in Islamic India या पुस्तकासाठी आपली बाबासाहेब पुरंदरेंशी एका शब्दाने देखील चर्चा झालेली नाही. असा खुलासा स्वत: लेखक जेम्स लेन याने केला आहे.
not a single word discussed with babasaheb purandare huge revelation made by james lane himself in exclusive interview
not a single word discussed with babasaheb purandare huge revelation made by james lane himself in exclusive interview

'शरद पवार यांच्यामुळे राज्यात जातीपातीचं राजकारण सुरु झालं. त्यातही जेम्स लेन प्रकरणावरुन बाबासाहेब पुरंदरेंसारख्या सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं.' अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केली होती. ज्याला उत्तर देताना शरद पवारांनी असं म्हटलं होतं की, 'जेम्स लेनने जे काही लिखाण केलं त्या लिखाणाचा आधार त्यांच्या लेखामध्ये त्यांनी स्वच्छपणे लिहलं होतं की, ही माहिती मी पुरंदरेंकडून घेतली. म्हणून तर त्याच्यावर टीका-टिप्पणी केली असेल तर मला त्यात दु:ख वाटत नाही. याउलट मला त्याचा अभिमान वाटतो.' मात्र आता या सगळ्या प्रकरणाबाबत एक Exclusive माहिती वादग्रस्त लेखक जेम्स लेन यांनी स्वत: दिली आहे. इंडिया टुडेचे ज्येष्ठ पत्रकार किरण तारे यांनी जेम्स लेनची ई-मेलद्वारे या सगळ्या संदर्भात मुलाखत घेतली असून त्यात जेम्स लेनने मोठा खुलासा केला आहे.

सगळ्यात आधी जाणून घेऊयात राज ठाकरे आणि शरद पवार यांचं जेम्स लेन पुस्तकाप्रकरणी बाबासाहेब पुरंदरेंबाबत नेमकं म्हणणं काय आहे:

पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते:

'बाबासाहेब पुरंदरे हे ब्राम्हण म्हणून त्यांना सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला म्हणे. महाराजांवर बाबासाहेबांनी, रणजीत देसाई, मेहेंदळे यांनी लिहिलं. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. पण बाबासाहेब पुरंदरेंमुळे घराघरात शिवाजी महाराज पोहोचले.'

'पण आम्हाला इतिहास बघायचा नाही. आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसानं लिहिलंय, ते बघायचंय. आम्ही छत्रपतींचा इतिहास सांगणार नाही. शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या माणसानं या महाराष्ट्रातला जातीपातीचा भेद गाडून टाकला पाहिजे. तुम्ही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी सुरु आहेत,' असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवार हे जातीयवादी असल्याचा घणाघाती आरोप केला होता.

राज ठाकरेंच्या आरोपाला शरद पवारांचं उत्तर:

राज ठाकरे यांनी जे आरोप केले होते त्याला शरद पवार यांनी देखील तात्काळ उत्तर दिलं. याबाबत पवार म्हणाले की, 'पुरंदरेंबाबत मी बोललो.. हो बोललोच मी.. मी काही रोखून ठेवत नाही. पण पुरंदरेंनी शिवछत्रपतींचा उल्लेख करताना त्यांनी जिजामातेनं शिवछत्रपतींचं व्यक्तीमत्व घडवलं हे सांगण्याऐवजी दादाजी कोंडदेव यांनी योगदान दिलं अशा प्रकारचं विधान केलं होतं. त्याला माझा सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व हे राजमाता जिजामाता यांनी कष्टानं उभं केलं.'

'त्यामुळे शिवाजी महाराज या पदापर्यंत पोहचायला कोणाचं योगदान असेल तर ते राजमातेचं योगदान होतं. बाबासाहेबांनी त्याबाबतीत एक भूमिका घ्यायचा प्रयत्न केला तो योग्य नव्हता. हे माझं मत तेव्हा होतं आणि आजही आहे. त्यासाठी मी निश्चितपणाने त्यावर टीका केली.'

'दुसरा गंभीर प्रकार हा होता की, जेम्स लेनने जे काही लिखाण केलं त्या लिखाणाचा आधार त्यांच्या लेखामध्ये त्यांनी स्वच्छपणे लिहलं होतं की, ही माहिती मी पुरंदरेंकडून घेतली. त्यामुळे एक गलिच्छ अशा प्रकारचं लिखाण एखाद्या लेखकाने केलं आणि त्याला माहिती पुरवायचं काम कोणी केलं हे उघड होत असेल आणि त्याचा खुलासा कधी पुरंदरेंनी केला नाही म्हणून तर त्याच्यावर टीका-टिप्पणी केली असेल तर मला त्यात दु:ख वाटत नाही. याउलट मला त्याचा अभिमान वाटतो.' असं म्हणत शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं.

या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील जनतेनेमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे की, जेम्स लेनने जे वादग्रस्त लिखाण केलं आहे ती माहिती त्याला नेमकी कोणी पुरवली? याचबाबत 16 एप्रिल रोजी स्वत: जेम्स लेन याने 'मुंबई Tak'ला ई-मेलच्या माध्यमातून एक मुलाखत दिली ज्यामध्ये त्याने खुलासा केला आहे की, Shivaji: Hindu King in Islamic India या पुस्तकासाठी आपली बाबासाहेब पुरंदरेंशी एका शब्दाने देखील चर्चा झालेली नाही.

जेम्स लेनची मुलाखत जशीच्या तशी:

प्रश्न: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची अवमानकारक माहिती कोणी पुरवली होती?

उत्तर (जेम्स लेन): तुम्ही प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारत आहात. मला कोणीही माहिती पुरवली नाही. माझं पुस्तक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या कथांबद्दल आहे. या कथा सांगत असलेल्या लोकांनी काय Narrative सेट करून ठेवलंय त्याबद्दल आहे. काही लोक रामदास यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात, तर काही तुकाराम महाराज यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात. यातलं काय खरं आहे, त्यात मला काहीही रस नाही. पण एक गट पहिल्या Narrative च्या बाजूने आहे तर दुसरा दुसऱ्या narrative च्या बाजूने. असं का?

प्रश्न: तुमच्याकडे असलेल्या अवमानकारक माहितीचा आधार काय?

उत्तर (जेम्स लेन): माझं पुस्तक काळजीपूर्वक वाचणाऱ्याच्या लक्षात येईल की मी कुठलंही ऐतिहासिक तथ्य मांडल्याचा दावा केलेला नाही. मी शिवाजी महाराजांचा अवमान केलाय, अशी टीका करणाऱ्यांनी चुकीचा अर्थ काढलाय. पुन्हा सांगतो मी कथांबद्दल बोलतोय, इतिहासातील तथ्यांबद्दल नाही.

not a single word discussed with babasaheb purandare huge revelation made by james lane himself in exclusive interview
'पुरंदरेंवरील टीकेचं दु:ख नाही तर अभिमान वाटतो', शरद पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

प्रश्न: या विषयाबाबत तुमचं बाबासाहेब पुरंदरेंशी बोलणं झालं होतं का? त्यांचं म्हणणं काय होतं?

उत्तर (जेम्स लेन): मी कधीही बाबासाहेब पुरंदरेंशी एका शब्दानेही बोललेलो नाही.

प्रश्न: महाराजांबद्दलचे अवमानकारक शब्द तुम्ही मागे घेतले. ते कशामुळे?

उत्तर (जेम्स लेन): युक्तिवाद करताना मी पुरेशी काळजी घेतली नाही आणि त्याचा परिणाम इतरांना भोगावा लागला.

प्रश्न: बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रसार केला. त्याकडे तुम्ही कसं बघता?

उत्तर (जेम्स लेन): पुरंदरे यांनी एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची थोरवी मांडली. त्याबद्दल त्यांचं कौतुकही झालं. त्यांच्यावर आज होत असलेली टीका ही अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात वाचला गेलेल्या इतिहासाचा परिपाक आहे. शिवाजी महाराजांचे वंशज खरेखुरे क्षत्रीय नव्हते असं त्या काळातील काही ब्राह्मणांना वाटत असे. त्यातून निर्माण झालेल्या रोषाचा परिणाम ब्राह्मण आणि मराठा यांच्यात इतिहासाच्या आकलनावरून झालेल्या वादात पाहायला मिळतो.

not a single word discussed with babasaheb purandare huge revelation made by james lane himself in exclusive interview
बाबासाहेब पुरंदरेंनी जेम्स लेनचं कौतुक केलं होतं?; पवारांचा आरोप आणि वादाचं कारण काय?

प्रश्न: तुमच्या पुस्तकावरून होणाऱ्या वादाकडे तुम्ही कसं बघता?

उत्तर (जेम्स लेन): छत्रपती शिवाजी महाराज महान नायक होते. त्यांचं चरित्र हा आज गांभीर्यपूर्वक अभ्यास करण्याचा विषय राहिलेला नाही याचं मला दुःख वाटतं. याउलट तत्कालिक राजकीय वाद निर्माण करण्यासाठी त्यांच्या चरित्राचा दुरुपयोग होतोय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in