
वसंत मोरे, इंदापूर: पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर शहरात सर्वात मोठी आर्थिक फसवणूक घोटाळा समोर आला आहे. लिलाव भिशीचीच्या माध्यमातून शेकडो जणांना आत्तापर्यंत 200 कोटींहून अधिक आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. इंदापूर शिवसेनेच्या वतीने हा आर्थिक घोटाळा समोर आणला आहे. गेली आठवडाभर याप्रकरणाची इंदापुरात मोठी चर्चा होती. त्यानंतर भिशी फसवणूक प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सोळा भिशी चालकांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पाच अधिकारी व इंदापूर पोलीस पोलिसांनी भिशी चालकांच्या घरी छापा टाकून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. छाप्यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे केली जप्त केली आहेत.
फिर्यादी संदीप पाटील यांनी या भिशी फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती, त्यावरून इंदापूर शहरातील अंबिका नगर येथील भिशी चालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पाच अधिकारी व इंदापूर पोलिसांनी शहरातील अंबिकानगर येथील या भिशी चालकांच्या घरावर छापा मारला असून घरातून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या कारवाईत पोलिसांनी चौकशी साठी दोन जण ताब्यात घेतले आहेत..
दरम्यान या घोटाळ्यांमध्ये अनेकांचे हात गुंतले असल्याची चर्चा सध्या इंदापूरमध्ये आहे. राजकीय वरदहस्ताने हा घोटाळा झाल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान, याप्रकरणी नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या भिशीमध्ये फसवणूक झालेल्यांना त्यांना त्यांची रक्कम परत मिळेपर्यंत शिवसेनेच्या वतीने मदत करण्याची हमी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील विशाल फटे प्रकरण ताजे असताना आता पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील भिशीचे प्रकरण पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या चार पाच वर्षापूर्वी इंदापूर शहरात भिशी चालवणारे अनेक जण उदयास आले आहेत. या भिशी चालकांनी कुठलाही कायदेशीर आधार नसताना, कुठला टॅक्स नाही, की अधिकृत रेकॉर्ड नसताना रोखीत लिलाव भिश्या सुरू केल्या आहेत. यात हातगाडी, टपरी, पथारी, भाजी विक्रेते असे अत्यंत किरकोळ छोटे व्यापारी ते बड्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना सामील केले.
किरकोळ छोटे व्यापारी यांची वेगळी भिशी तर बड्या व्यावसायिकांची वेगळी भिशी केल्या. यात मोठ्या भिशीची रक्कम 50 लाख ते कोटी-दोन कोटींची तर किरकोळ व्यापाऱ्यांची 5-10 लाखांची व 10 लाखांच्या खाली किरकोळ छोटे व्यापारी सहभागी आहेत.
पाहा पोलीस अधिकाऱ्यांनी काय दिली माहिती
याप्रकरणी बोलताना पोलिसांनी अशी माहिती दिली की, 'इंदापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी भादंवि कलम 403, 408, 409 आणि 420, 120 (B)यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. फिर्यादी संदीप पाटील यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, भिशीच्या नावाखाली फसवणूक केली आहे. भिशी लावतो आणि जमीन खरेदी करतो या अनुषंगाने आरोपीने लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळले आहेत.'
'याच तक्रारीनुसार पाच आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे. अजूनही तपासात पुढील बाबी निष्पन्न होतील. त्यानंतर संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल.' अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
लिलाव भिशी नेमकी कशी चालवली जाते?
भिशी चालकांनी भिशी ही काही ठराविक लोकांमध्ये सुरू केली. ही एक साखळी पद्धत आहे, यात भिशीमध्ये 20 किंवा त्यापेक्षा अधिक सभासद केले गेले, यात प्रत्येकाने किती रक्कम द्यायची ही अगोदरच ठरविली गेली. प्रत्येक सभासदाने ठरविल्याप्रमाणे (यात प्रत्येकी सात दिवस किंवा एक महिना) दिवसांनी प्रत्येक सभासदांनी ठरविलेली रक्कम भिशी चालकाकडे नियमित रोख स्वरुपात भरायची. भिशी चालकाने ती सर्व सभासदांकडून ती रक्कम गोळा करायची. नंतर या रक्कमेचा लिलाव केला जातो.
ज्याला पैशाची गरज असेल तो हा लिलाव वाढवत जातो. जर त्याला भिशी परवडत असेल तर तो जास्तीचा लिलाव करून ती भिशी उचलतो. त्यानंतर त्या भिशीचा लिलाव जेवढा रुपयांचा झाला आहे तेवढे रुपये कट करून त्याला ती सर्व सभासदांची जमलेली रक्कम दिली जाते व यात राहिलेल्या रक्कमेचे व्याज सगळ्यात वाटून घेतात. असे प्रत्येक महिन्याला/ आठवड्याला 1 सभासद भिशी घेत असतो. हे सर्व अनधिकृतपणे असते.
नेमकी कशी झाली आर्थिक फसवणूक
भिशीचे विविध प्रकार असले तरी दोन प्रकारच्याच भिशी प्रसिद्ध आहेत़ कमिशन बेसीस अर्थात लिलाव भिशी व बिन व्याजी भिशी़ या दोनपैकी लिलाव बेसिस भिशी अत्यंत जोखिमपूर्ण व लाभदायकही ठरते़. त्यामुळे अनेकजण रिस्क स्वीकारून या भिशीत उतरतात़. दरम्यान, शहराच्या बाजारपेठेतील जवळपास प्रत्येक व्यापारी पुकार भिशीच्या विळख्यात अडकलेला आहे़.
एक भिशी चालक किंवा मध्यस्थी हा एका वेळी दहा ते पंधरा पुकार भिशी चालवित असतात़ बहुतांश वेळा भिशी मध्येच त्या बंद पाडायच्या किंवा बंद पडल्या नंतर असे भिशी चालक अर्ध्यातून भिशी बुडवून फरार झाले आहेत. त्यामुळे यात शेकडो जणांची कोट्यवधीची आर्थिक फसवणूक झाली.
भिशी चालकांनी विकत घेतल्या नातेवाईकांच्या नावावर बेहिशेबी मालमत्ता..
भिशी चालकांनी यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा मिळवत स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावावर ती इंदापूर शहरात व तालुक्यात मालमत्ता केल्या आहेत, स्वतः भिशी चालक व त्यांचे नातेवाईक सध्या अलिशान गाड्या फिरत आहेत. ज्या सर्वसामान्य लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून लाखो रुपये त्यांच्या हातात दिले ते भिशी चालक आता या सर्वसामान्य लोकांना दमदाटी करीत असल्याचे इंदापूरमध्ये चित्र आहे. प्रसंगी पोलीस ठाण्यात खोट्या केसेस दाखल करून सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण त्यांनी करून ठेवले आहे. त्यामुळे या भिशी चालकांना पैसे मागण्यासाठी कोणीच धाडस करीत नव्हते.
परंतु इंदापूर शहरातील शिवसेना पक्ष आता पुढे सरसावल्याने या प्रकरणातील आर्थिक घोटाळा समोर आला असून यासंदर्भात शिवसेनेचे शहराध्यक्ष मेजर महादेव सोमवंशी यांनी पुढाकार घेतला असून इंदापूर पोलीस ठाण्यात यासंदर्भात पंधरा ते वीस चालकांविरोधात तक्रार दाखल केली आहे..
जोपर्यंत इंदापूर शहरातील आर्थिक फसवणूक झालेल्या नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळेपर्यंत हा भिशी चालकांविरुद्धचा लढा सुरूच ठेवणार असल्याचं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.