
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (23 जानेवारी) केलेल्या भाषणात भाजपवर खरपूस टीका केली होती. भाजपचं हिंदुत्व हे पोकळ हिंदुत्व आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला होता. आता त्यांच्या याच टीकेला विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'बाबरी मशिद आणि रामजन्मभूमी आंदोलनात गोळ्या खाणारे आम्ही होतो. तुम्ही तेव्हा फक्त तोंडाची वाफ दडवत होता.' असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'राम जन्मभूमी, बाबरी मशिद हे विषय सोडून द्या ते मोदींनी करुन दाखवलं. राम मंदिर मोदीजींच्या नेतृत्वात तयार होतं आहे. पण तुम्ही साधा कल्याणचा दुर्गाडीचा प्रश्न नाही सोडवू शकले. श्रीमलंगगडाचा प्रश्न नाही सोडवू शकले. कशा रामजन्मभूमीच्या गप्पा मारता?' असा सवाल करत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला.
देवेंद्र फडणवीसांची तोड धडाडली, शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर
'तुम्ही फक्त तोंडाची दडवत होते'
'रामजन्मभूमीच्या आंदोलनात कोण होते तुमचे? राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये लाठ्या-काठ्या आणि गोळ्या खाणारे आम्ही आहोत. तुम्ही तोंडाची वाफ दडवत होते.' अशी टीका यावेळी फडणवीसांनी शिवसेनेवर केली आहे.
'औरंगाबादचं संभाजीनगर करु शकले नाहीत, तिकडे अलाहबादचं प्रयागराज झालं'
'भाषणाच्या पलीकडे तुमचं हिंदुत्व काय? त्या प्रश्नावर इतके वर्ष खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी संघर्ष केला पण जेव्हा तुमचे मुख्यमंत्री होते तेव्हाही तुम्ही सोडवला नाही आणि आजही तुम्ही सोडवला नाही. त्यामुळे तुमचं हिंदुत्व हे कागदावरचं हिंदुत्व आहे. हे भाषणातील हिंदुत्व आहे.'
'तुम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करु शकले नाहीत. तुम्ही उस्मानाबादचं धाराशीव करु शकले नाहीत. तुमच्याच घोषणा होत्या ना. नाही करु शकले तुम्ही.. पण तिकडे अलाहबादचं प्रयागराज झालं. ते त्यांनी करुन दाखवलं आणि तुम्ही बोलत राहिलात. हिंदुत्व जगावं लागतं. हिंदुत्व भाषणापुरतं मर्यादित नसतं. मोदीजींनी ते करुन दाखवलं.' असं म्हणत फडणवीसांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलं आहे.
'मोदीजींनी करुन दाखवलं'
'आज काशी-विश्वनाथाचं जे मंदिर मुघल आक्रमकांनी तोडलं होतं त्या काशी विश्वनाथाला त्याचं पूर्ववैभव देण्याचं काम मोदीजींनी करुन दाखवलं आहे. केलंय तुम्ही कधी? आज प्रयागराजमध्ये हिंदूंच्या आस्थेचा कुंभ ज्याप्रकारे आयोजित केलं आणि त्यासाठी ज्याप्रकारे सोयी तयार करण्यात आल्या आहेत तशा सोयी तुम्ही केल्या कुठे तयार?' असा सवालही फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर आता भाजपने देखील तेवढ्याच आक्रमकपणे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे आता याबाबत शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणारआहे.