Bigg Boss: शिवलीला पाटील यांच्या किर्तनाचे आयोजन, आयोजकांवर गुन्हा दाखल
organizing kirtan of shivlila patil filing case against the office bearers of navratri mandal(फाइल फोटो)

Bigg Boss: शिवलीला पाटील यांच्या किर्तनाचे आयोजन, आयोजकांवर गुन्हा दाखल

Bigg Boss Shivlila Patil: बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या शिवलिला पाटील यांच्या किर्तनाच्या आयोजनानंतर आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलडाणा: बिग बॉसच्या घरातून नुकत्या बाहेर पडलेल्या किर्तनकार शिवलिला पाटील यांच्या किर्तनाचं आयोजन करणं हे आयोजकांच्या अंगलट आलं आहे. राज्यात अद्याप कोरोनासंबंधी अनेक नियम लागू आहेत. अशावेळी किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करुन गर्दी जमवल्याने आता आयोजकांविरोधातच पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून कीर्तनाच्या कार्यक्रमात गर्दी जमविणे देऊळगाव महीच्या राजमाता दुर्गा उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या अंगलट आलं आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान बिग बॉस फेम हभप शिवलिला पाटील यांच्या कीर्तनास जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने विरोध दर्शविला असतानाही आयोजक आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि शिवलीला यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पाडला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी जमवू नये असे आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी दिलेले असताना देखील देऊळगाव मही येथील राजमाता जिजाऊ दुर्गा मंडळ यांच्या वतीने ह. भ. प. शिवलीला पाटील यांचे कीर्तनाचे 9 ऑक्टोबरला आयोजन करण्यात आले होते.

यावेळी देऊळगाव मही येथील मंडळातर्फे आयोजित सदर कीर्तनाच्या कार्यक्रमास दोनशेच्यावर महिला व पुरुषांनी गर्दी केली होती. यासंदर्भात देऊळगाव राजा पोलिसांत राजमाता मंडळाचे आयोजक संदीप राऊत, गणेश गोरे आणि किशोर पोफळकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दुसरीकडे शिवलीला पाटील यांनी 'बिग बॉस'मध्ये एंट्री केल्याने त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमास विरोध करण्यात येत आला होता.

देऊळगाव मही येथे शिवलीला पाटील यांचं किर्तन असल्याचे समजताच जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने बिग बॉस फेम शिवलीला पाटील यांचा निषेध करीत सदर कीर्तनाचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी आयोजकांकडे केली होती.

बिग बॉस हा शो पाश्चात्य संस्कृतीचे दर्शन घडविणारा असून यामध्ये सहभागी होऊन हरीभक्त पारायण या सन्मानाचा अवमान झाला असल्याची भूमिका वारकरी संप्रदायाने व्यक्त करीत सदर कीर्तनाच्या कार्यक्रमास विरोध दर्शविला होता. तरीही आयोजकांनी माघार घेतली नाही. ते शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.

युवा वर्गाला धार्मिक आणि वारकरी संप्रदाय माहिती झाला पाहिजे म्हणून कीर्तन ठेवले असल्याचे मतही आयोजकांनी व्यक्त केलं. पण कोरोना काळात गर्दी जमवल्याच्या आरोपाखाली आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बिग बॉसमध्ये गेले ही चूक झाली, मी माफी मागते: शिवलिला पाटील

'माझ्या बिग बॉस मराठी या कार्यक्रमात जाण्याच्या निर्णयामुळे वारकरी संप्रदाय दुखावला असेल तर मी त्यांची माफी मागते. माझा मार्ग चुकला असला तरीही माझा हेतू शुद्ध होता. यापुढे ज्येष्ठांचा सल्ला घेतल्याशिवाय मी असा कोणताही निर्णय घेणार नाही.'

'वारकरी संप्रदायातले अनेक ज्येष्ठ माझ्यावर नाराज आहेत. त्या सर्वांची मी दोन्ही हात जोडून नतमस्तक होत माफी मागते. माझे विचार लोकांपर्यंत पोहचवणे हाच माझा त्यामागचा प्रामाणिक उद्देश होता.' असं म्हणत कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी जाहीर कीर्तनात वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे.

विरोध करणाऱ्यांना शिवलिला पाटील यांनी काय दिलं उत्तर?

'शिवलीला ही शेतकऱ्याची मुलगी असून फक्त एक मुलगी महिला कीर्तनकार असल्यानेच विरोध होत असल्याचं शिवलिला यांनी कीर्तनात सांगितलं. बिग बॉसमध्ये आपल्या धर्माची संस्कृती, आपला संप्रदाय, माझे कीर्तन, माझी तुळशीमाळ अख्ख्या महाराष्ट्राला दिसावी म्हणून मी तिथे गेले होते.'

'मी तिथं राहून वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविले. त्याठिकाणी अभंगावर बोलले, ज्ञानेश्वरी वाचन करणे, तुळशीचे पूजन सोडले नाही. वारकरी संस्कृती जपूनच बिग बॉसच्या घरात राहिले. मी जिजाऊंची लेक असल्याने कोणालाही घाबरत नाही.' असंही यावेळी शिवलिला पाटील म्हणाल्या.

वारकरी संप्रदायाकडून का करण्यात आला विरोध?

वारकरी संप्रदाय सोडून शिवलीला पाटील या विकृत संस्कृतीकडे गेल्या आणि पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण केले. असं म्हणत वारकरी महामंडळाने त्यांना विरोध केला. तर महाराष्ट्रात त्यांचे कुठेही कीर्तन असले तर ते वारकरी महामंडळ होऊ देणार नाहीय. जर कीर्तन करायचे असेल तर पाटील यांना जेष्ठ मंडळींची परवानगी घेऊनच कीर्तन करता येईल. असंही वारकरी महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.