'बोल ना आंटी आऊं क्या?' गाणाऱ्या मुलामुळे रद्द झाली पाकिस्तान-न्यूझीलंड सीरिज! वाचा काय घडलं?

पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री फवाद चौधरी सोशल मीडियावर ट्रोल
'बोल ना आंटी आऊं क्या?' गाणाऱ्या मुलामुळे रद्द झाली पाकिस्तान-न्यूझीलंड सीरिज! वाचा काय घडलं?

न्यूझिलंड क्रिकेट टीमने सुरक्षेचा कारणांचा हवाला देत पाकिस्तानच्या विरोधात सीरिज खेळण्यासाठी नकार दिला आहे. ही टीम मधेच आपला दौरा अर्धवट टाकून मायदेशी परतली आहे. या घटनेनंतर पाकिस्तानची प्रचंड फजिती झाली आहे.

यानंतर पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी या प्रकरणाचं खापर ओम प्रकाश मिश्राच्या डोक्यावर फोडलं आहे. सोशल मीडियावर तेव्हापासूनच ओम प्रकाश मिश्रा हा भारतीय रॅपर ट्रेंड होतो आहे. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊ.

फवाद चौधरी यांनी एका पत्रकार परिषदेत हा आरोप केला की पाकिस्तान न्यूझीलंड सीरिज रद्द होण्यामागे भारताचा हात आहे. भारतातून न्यूझीलंडच्या क्रिकेट टीमला धमकीचा ईमेल पाठवला गेला होता ज्यानंतर न्यूझीलंडने पाकिस्तानचा दौरा रद्द केला. हा धमकी देणारा मेल भारतीय रॅपर ओम प्रकाश मिश्रा याने न्यूझीलंडचा क्रिकेटर मार्टिन गुप्टिलच्या पत्नीला पाठवला होता. यानंतर लगेचच ट्विटरवर #OmPrakashMishra हा ट्रेंड होऊ लागला. युझर्सनी यावरून पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे. 2017 मध्ये ओम प्रकाश मिश्रा नावाच्या एका रॅपरच्या बोल ना आंटी आऊं क्या या गाण्याने सोशल मीडियावर खूप लक्ष वेधलं होतं. या गाण्याची चर्चा बरीच झाली होती.

अशात पाकिस्तानच्या सूचना प्रसारण मंत्र्यांनी या मुलाचं नाव घेतल्याने सोशल मीडियावर त्यांची प्रचंड खिल्ली उडवली जाते आहे. ओम प्रकाश मिश्रा सारखा एक साधा रॅपर हा सीरिज रद्द करण्याचं कारण कसं काय ठरू शकतो? असा प्रश्न विचारत फवाद चौधरी यांना ट्रोल करण्यात आलं आहे.

एवढंच नाही तर पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांच्या काही क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चौधरी यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये ओम प्रकाश मिश्राचा फोटो दाखवला होता. तो फोटोही व्हायरल होतो आहे. एका युझरने तर असंही म्हटलं आहे की आता ओम प्रकाश काय विचार करत असेल?

दरम्यान भारताने पाकिस्तानकडून करण्यात आलेले दावे फेटाळले आहेत. पाकिस्तानने तर असाही आरोप केला होता की पाकिस्तानमध्ये काही स्फोट आणि दहशतवादी कारवाया झाल्या त्यामागे भारताचा हात होता. मात्र या सगळ्या आरोपांचं भारताने खंडन केलं आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर लोकांनी या संपूर्ण प्रकरणाची खिल्ली उडवली आहे आणि पाकिस्तानच्या विरोधात तसंच फवाद चौधरींच्या विरोधात मीम्सही तयार करून ते व्हायरल केले आहेत.

Related Stories

No stories found.