'ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं'

ओबीसी मेळाव्यात पंकजा मुंडे यांचं वक्तव्य
पंकजा मुंडे
पंकजा मुंडे

ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीफ केली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे ताशेरे झाडले. त्यावेळी त्यांनी ही बाबही आवर्जून नमूद केली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांनाही 10 टक्के आरक्षण दिलं. राज्य सरकारने ओबीसी आरक्षण संदर्भात आत्ता अध्यादेश काढला तो आधी का काढला नाही असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

भाजपच्या ओबीसी जागर अभियानाच्या अंतर्गत औरंगाबादमध्ये ओबीसी मोर्चाचं आयोजन भाजपने केलं होतं. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी भाषण करत असताना देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं असं वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या, 'हल्ली एक नवं षडयंत्र सुरू झालं आहे, बहुजनाची व्याख्या खराब करण्याचं हे षडयंत्र आहे. कुणीही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उचलला की तिकडे कुणीतरी षडयंत्र करणारे लोक मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उचलून धरतात. अरे मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं कामही तुम्हीच केलं आहे. ज्या मुख्यमंत्र्यांची जात तुम्ही रोज काढत होतात त्याच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे.'

मराठा समजाला आरक्षण दिलं, त्या मराठा समाजाचं आरक्षण आज संपुष्टात आलं. ओबीसी समाजाचं आरक्षण बचाव कऱण्याचा प्रयत्न आम्ही केला. ते आरक्षण संपुष्टात आलं. महाराष्ट्रात आज राजकीय भविष्य काय? येत्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवण्याचं काम या सरकारने केलं आहे असंही पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या. सरकारने काढलेला ओबीसी समाजाच्या राजकीय अध्यादेश हा टिकला पाहिजे. सरकारने आगामी निवडणुकांसाठी तो टिकवून दाखवावा, तसं झाल्यास आम्ही सरकारचं कौतुक करू. पण ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं नाही तर रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही यावेळी पंकजा मुंडे यांनी दिला आहे.

इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारने नाही दिला या भूमिकेत सरकारने अडून बसायला नको. आम्ही सत्तेत असतो तरीही आम्ही स्वतःहून भूमिका घेतली असती. ओबीसी समाजाच्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष देणं आवश्यक घेतील. दसरा मेळाव्यासाठी लोकांनी आणि गावकऱ्यांनी तयारी केली आहे. मी तिथे जाऊन बोलणार आहे. मलाही आनंद होतो आहे की मी तिथे जाऊन बोलणार आहे असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं. एवढंच नाही तर सरकारने जो अध्यादेश काढला तो अध्यादेशही आम्ही आंदोलन केलं म्हणून काढला असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in