'हो! तुम्ही सांगायचं मी करायचं'; पंकजा मुंडेंच्या निमंत्रणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल

आपला दसरा आपली परंपरा : पंकजा मुंडेंनी दिलं दसरा मेळाव्याचं निमंत्रण
'हो! तुम्ही सांगायचं मी करायचं'; पंकजा मुंडेंच्या निमंत्रणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल
पंकजा मुंडें यांनी शेअर केलेल्या व्हिडीओतील दृश्य.

'हो! तुम्ही सांगायचं, मी करायचं... आपला दसरा, आपली परंपरा..!' अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं. निमंत्रणाचा एक व्हिडीओ पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट केला असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

कोरोनामुळे तब्बल दोन वर्षानंतर सावरगाव घाट येथील राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मगावी होणाऱ्या दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. स्वत: खासदार प्रीतम मुंडे यांनी काल (12 ऑक्टोबर) या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला.

त्यानंतर पंकजा मुंडे यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून समर्थकांना सावरगाव घाट येथील भगवान गडावर दसरा मेळाव्यासाठी येण्याचं आवाहन केलं आहे. 'हो... तुम्ही सांगायचं, मी करायचं. आपला दसरा, आपली परंपरा!!', असं पंकजा मुंडेंनी या व्हिडीओत म्हटलं आहे.

पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी समर्थकांना दसरा, दसऱ्याची परंपरा, भगवान भक्तीगडाचं महत्व, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचं मेळाव्याशी असलेलं नातं आणि त्यांची परंपरा याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

काय म्हणाल्या आहेत पंकजा मुंडे?

'तुम्ही आदेश द्यायचा आणि मी झेलायचा, हे आपलं नातं आहे. तुमचा आदेश आला… ताई मेळावा झालाच पाहिजे; मेळावा झाला. तुमचा आदेश आला… ताई संघर्ष केलाच पाहिजे; संघर्ष केलाच पाहिजे… मी संघर्ष केला. तुमचा आदेश आला वाडी वस्त्यावरच्या रस्त्यावरचं काय? वाडी वस्त्यावर रस्ते पोहोचले… तुमचा आदेश आला शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं त्याचं काय?… शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये विमा पोहोचला, अनुदान पोहोचलं. तुमचा आदेश आला मुलींचा जन्मदर घटतोय त्याचं काय? बेटी बचाव, बेटी पढाओमध्ये मुलींचा जन्मदर वाढवण्याचं काम सुरू आहे.'

'तुमचा आदेश आला आणि ऊस तोडण्याच्या कोयत्याला मान देण्याचा प्रयत्न केला गेला. तुमच्या आदेशासाठी अनेकवेळा मी मान खाली घातली आणि तो आदेश ऐकला; पण तुमची मान कधी खाली जाऊ दिली नाही. मी सत्तेच्या मंचावर असेल नाही, तर विरोधात असेल. तुम्ही माझ्यावर कधी माया पातळ केली नाही. तुम्ही म्हणालात त्या प्रत्येक लढ्यात तुमच्यासमोर उभे राहिले, कारण माझ्यामागे तुम्ही होतात. आपलं नातंच असं आहे. तुम्ही सांगायचं आणि मी करायचं.'

'आताही तुम्हीही म्हणालात ताई, आपली परंपरा जपली पाहिजे. भगवानबाबांच्या भक्तीची आणि मुंडे साहेबांच्या शक्तीची परंपरा. मुंडे साहेबांना दर दसऱ्याला कधी मुंबई, तर कधी दिल्ली दिसायची. मला मात्र दसऱ्याला भव्य जनसागरामध्ये केवळ अन् केवळ भगवानबाबांचे आशीर्वाद आणि मुंडे साहेबांची मूर्ती दिसते. आताही तुम्ही सांगितलं मेळावा झाला पाहिजे आणि 15 ऑक्टोबरला भगवान बाबांची भक्ती आणि मुंडे साहेबांची शक्ती या परंपरेसाठी मी येत आहे... सावरगाव, भगवान भक्ती गड येथे. आपल्या सर्वांची मी वाट पाहत आहे', असं भावनिक आवाहन पंकजा यांनी या व्हिडीओतून केलं आहे.

Related Stories

No stories found.