100 कोटी वसुलीचा आरोप: "परमबीर सिंहांचेे आरोप ऐकीव माहितीच्या आधारावर"; वकिलांची माहिती

वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी चांदीवाल आयोगाला दिलेल्या माहितीने संपूर्ण प्रकरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
100 कोटी वसुलीचा आरोप: "परमबीर सिंहांचेे आरोप ऐकीव माहितीच्या आधारावर"; वकिलांची माहिती
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी वसुलीच्या प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे. तत्कालीन गृहमंत्र्यांवर करण्यात आलेला आरोप केवळ ऐकीव माहितीवर होता. नक्की काय घडलं, याबद्दल त्यांना काही माहिती नाही, असा खुलासा परमबीर सिंह यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी केला आहे.

सचिन वाझेला एनआयएकडून अटक करण्यात आल्यानंतर गृह विभागाकडून मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंह यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

या प्रकरणाची चौकशी सीबीआय आणि ईडीकडून सुरू आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्य सरकारनेही न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला असून, चांदीवाल आयोगासमोर परमबीर सिंह यांचे वकील अधिवक्ता अभिनव चंद्रचूड यांनी ही माहिती मांडली.

सुरुवातीला सचिन वाझे यांची बाजू मांडताना वकील नायडू म्हणाले, "त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या पुराव्यांच्या गुणवत्तेबद्दल मी भाष्य करणार नाही. तक्रारकर्त्याने (परमबीर सिंह) चौकशीसाठी हजर व्हायला हवे. आम्ही चांगल्या हेतूने चौकशीत सहकार्य करत असून, आयोग सत्य आयोगच शोधणार आहे. मात्र, पुरावे प्राथमिक स्त्रोताकडून यायला हवे. वाझे यांनी स्वतःच आयोगासमोर सांगितलं आहे की, ते यात एक छोटा मासा आहेत."

त्यानंतर परमबीर सिंह यांच्यावतीने बाजू मांडताना चंद्रचूड म्हणाले, "मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी (परमबीर सिंह) आयोगासमोर हजर होऊ इच्छित नाही. त्यांना जे काही सांगायचं होतं, ते त्यांनी मार्चमध्ये मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आधीच सांगितलं आहे. परमबीर सिंह एका आठवड्यात शपथपत्र सादर करतील," असं चंद्रचूड म्हणाले.

परमबीर सिंह यांना काही अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली होती. नक्की काय घडलं, याबद्दल त्यांना प्रत्यक्षात कोणतीही माहिती नाही. याचाच अर्थ त्यांनी दिलेली माहिती केवळ ऐकीव आहे. त्यामुळे त्यांनी साक्ष नोंदवली असती, तरी त्याला कायद्यात काही किंमत नाही. कारण हे सगळं त्यांना इतर कुणीतरी सांगितलं. त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीही नाहीये," परमबीर सिंह यांच्या वकिलांनी चांदीवाल आयोगाला सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in