'Parambir Sing यांचं शेवटचं लोकेशन अहमदाबाद, देशाबाहेर पळून जाण्यास केंद्राने केली मदत'

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गंभीर आरोप
'Parambir Sing यांचं शेवटचं लोकेशन अहमदाबाद, देशाबाहेर पळून जाण्यास केंद्राने केली मदत'
परमबीर सिंग(फाइल फोटो)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पळून जायला केंद्र सरकारने मदत केली असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मुंबई तकला दिलेल्या विशेष मुलाखतीत नाना पटोले यांनी हा आरोप केला आहे. परमबीर सिंग देशाबाहेर गेले आहेत अशा बातम्या कालपासून येऊ लागल्या आहेत. परमबीर सिंग देशात आहेत की नाही याबाबत विविध तर्क-वितर्क सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई तकने नाना पटोले यांच्याशी संवाद साधला.

काय म्हणाले नाना पटोले?

'परमबीर सिंग यांचं शेवटचं लोकेशन अहमदाबादमध्ये मिळालं असं तपास यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहे. तपास यंत्रणेला हे वाटतंय की ते देशात नाहीत बाहेर गेले आहेत. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही त्या राज्यांमधल्या काही IAS, IPS अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्यांना बदनाम कसं करता येईल त्याचं प्लानिंग केंद्राकडून केलं जातं आहे. हा आत्ताचा प्रकार नाही गेल्या सात-आठ वर्षांपासून मोदी सरकार हेच करतं आहे.'

'सचिन वाझे प्रकरणानंतर ज्या काही घटना घडल्या त्यात परमबीर सिंग यांचा पुरेपूर वापर करण्यात आला. परमबीर सिंग पोलीस आयुक्त असताना मुंबईच्या आयुक्तालयातून सीसीटीव्ही फुटेज गायब झालं आहे. याची जबाबदारी पूर्णतः त्यांचीच आहे. केंद्र सरकारने त्यांना पाठिंबा दिला. राज्य सरकारने परमबीर सिंग यांच्यावर सुरूवातीलाच कारवाई करायला हवी होती. हा सगळा प्रकार केंद्राकडे गेल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांकडे गेल्यानंतर त्यांनी अनिल देशमुख यांना टार्गेट केलं.'

मनसुख हिरेनच्या हत्येत परमबीर सिंग यांचाही हात

'सचिन वाझेंचा जबाब, परमबीर सिंग यांनी पत्र लिहून सांगणं की अनिल देशमुख हे शंभर कोटींची मागणी करत होते. या सगळ्यात परमबीर सिंग यांचा उपयोग केंद्र सरकारने केला. मनसुख हिरेनचा खूनही प्रदीप शर्मा, परमबीर सिंग आणि सचिन वाझे या तिघांनी मिळून आखलेला कट होता अशाही काही बातम्या समोर आल्या आहेत. या सगळ्याचं तात्पर्य हेच आहे की ज्या राज्यांमध्ये सत्ता नाही तिथे अशा अधिकाऱ्यांना हाताशी धरायचं आणि त्या राज्याला बदनाम करायचं. परमबीर सिंग यांचा इथला उपयोग संपला होता त्यामुळे विदेशात पळून जायला त्यांना केंद्राने मदत केली' असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

कार्यक्रम करू असं परमबीर सिंग यांना सांगितलं असेल

देश सोडून जा नाहीतर इथे आम्ही तुमचा कार्यक्रम करू असं केंद्र सरकारने परमबीर सिंग यांना बजावलं असणार आहे त्यामुळेच त्यांनी देश सोडला असेल असंही नाना पटोले म्हणाले. परमबीर सिंग यांचा वापर संपला आता सत्य काय आहे ते लपवलं जावं म्हणून त्यांना परदेशात पाठवलं गेलं आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in