Corona लसीचा एकही डोस न घेतलेल्या नागरिकांना TMT बसमध्ये प्रवेश नाही

प्रवाशांना लसीचे डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि युनिव्हर्सल पास सोबत बाळगणं गरजेचं
Corona लसीचा एकही डोस न घेतलेल्या नागरिकांना TMT बसमध्ये प्रवेश नाही

कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये लसीकरणाबद्दल जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिकेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेल्या व्यक्तींना आता महापालिकेच्या बसमध्ये प्रवेश मिळणार नाहीये. महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी हा निर्णय घेतला असून याबद्दल लवकरच अंमलबजावणी होणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोविड 19 ची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सद्यस्थ‍ितीत लस हाच एकमेव उपाय असून सर्वत्र लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ठाण्यात देखील लसीकरण मोहिम सुरु असून जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे व एकमेकांपासून दुसऱ्याला संसर्ग होवू नये यासाठी खबरदारी म्हणून लसीकरणाचा किमान एक डोस घेतलेल्या नागरिकांना टी एम टी बसमध्ये प्रवेश देण्यात येईल असे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे. यासाठी नागरिकांनी लसीकरणाचा एक किंवा दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा युनिव्हर्सल पास जवळ बाळगणे गरजेचे आहे.

मागील काही दिवसांमध्ये लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे, महापालिकेच्या माध्यमातून यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. आज सर्वत्र लसीकरण केंद्रे उपलब्ध आहेत. 'जम्बो लसीकरण मोहिम', 'लसीकरण ऑन व्हील' तसेच नुकतेच 'हर घर दस्तक' हा उपक्रम देखील सुरू करण्यात आला आहे, तरी ठाण्यातील नागरिकांनी लसीकरणाच्या अफवांवर विश्वास न ठेवता नि:संकोचपणे लसीकरण करुन घ्यावे व स्वत:सह आपले कुटुंब व आपले शहर सुरक्षित ठेवण्यास सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

दरम्यान, ठाणेकरांनी या निर्णयाला विरोध केला असुन आधीच लोकलमध्ये प्रवेश मिळत नाही आणि आता बस सेवेत असे नियम लावले तर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होईल त्यामुळे घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी ठाणेकर नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in