छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर ते विठू माऊली; वाराणसीमध्ये मोदी काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वारासणीतील विस्तारित काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी काशीच्या प्राचीन इतिहास आणि परंपरेला उजाळा दिला. काशी विश्वनाथाच्या चरणी लीन होत असल्याचं सांगत मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.

काशी विश्वनाथाच्या लोकार्पण कार्यक्रमात मोदी काय म्हणाले?

‘आपल्या पुराणात सांगण्यात आलंय की, जो कुणी काशीत प्रवेश करतो, तो सर्व बंधनातून मुक्त होऊन जातो. भगवान विश्वेश्वराचा आशीर्वाद, इथे आल्यानंतर एक अलौकिक शक्ती आपल्या आंतरआत्म्याला जागृत करते. आज इथल्या वातारवणात वेगळंच चैतन्य आहे. शाश्वत वाराणसीच्या संकल्पात एक वेगळं सामर्थ्य दिसत आहे. आपण शास्त्रात ऐकलेलं आहे की, जेव्हाही चांगली गोष्ट घडत असते, तेव्हा सर्व देवीदेवता काशी विश्वेश्वराच्या येथे हजर होतात. असाच काहीसा प्रत्यय मला आज बाबांच्या दरबारात येत आहे’, असं मोदी म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘काशी विश्वनाथ धाम हा फक्त परिसर नाहीये. हे केवळ भव्य भवन नाही, तर हे आपल्या सनातन संस्कृतीचं प्रतिक आहे. आपल्या आध्यात्मिक आत्माचं प्रतिक आहे. आपल्या प्राचीनतेचं आणि परंपरेचं प्रतिक आहे. भारताच्या ऊर्जेचं आणि गतिशीलतेचंही हे प्रतिक आहे. प्राचीनता आणि नाविन्यता आज उभी राहिली आहे. याचं दर्शन आपण काशी विश्वनाथाच्या रुपाने आपण वारासणीत घेत आहोत’, असंही मोदी यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

अहिल्याबाई होळकर ते मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट;
काय आहे काशी विश्वनाथ कॉरिडॉर?

ADVERTISEMENT

आपल्या पुराणांमध्ये काशीचं भव्यदिव्य वर्णन केलं गेलं आहे. आपल्या ग्रंथांत बघितलं, तर ते दिसतं. इतिहासकारांनीही तलाव आणि वृक्ष संपदा असलेल्या काशीचं वर्णन केलेलं आहे. पण, वेळ एकसारखीच राहत नाही. या नगरीवर आक्रमण करण्यात आलं. या नगरीला उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले गेले. औरंजेबाने केलेल्या अत्याचार आणि दहशतवादाचा साक्ष इतिहास देतो. ज्याने तलवारीच्या बळावर सभ्यतेला बदलण्याचा प्रयत्न केला. ज्याने संस्कृतीला कट्टरतावादाने चिरडण्याचा प्रयत्न केला. पण, या देशाची माती इतर जगाच्या तुलनेत वेगळी आहे. इथे जेव्हा औरंगजेब येतो, तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजीही सामना करण्यासाठी उभे ठाकतात. जेव्हा सालार मसुद येतो, तेव्हा राजा सुहेलदेवांसारखे योद्धे त्याला आपल्या एकजुटीची शक्ती दाखवून देतात’, असं मोदी म्हणाले.

‘इंग्रजांच्या काळातही वाराणसीचे हाल केले गेले. वेळेची किमया बघा. माझी वाराणसी पुढे चालली आहे. इथे मृत्यूही मंगल आहे. उत्तर प्रदेशात वसलेल्या काशीतील मंदिर तोडलं गेलं. तेव्हा माता अहिल्याबाई होळकरांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. ज्यांची जन्मभूमी महाराष्ट्र होती, त्यांची कार्यभूमी इंदूरसह अनेक क्षेत्र होती. त्या माता अहिल्याबाई होळकरांना मी नमन करतो. दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वी त्यांनी या वाराणसीसाठी किती मोठं काम केलं. त्यानंतर काशीसाठी इतकं आता झालं आहे’, असं मोदी म्हणाले.

Kashi Vishwanath : काशी विश्वनाथ कॉरिडॉरची नजर खिळवून ठेवणारी दृश्ये

पालखी महामार्गांचा उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी महाराष्ट्रात तयार करण्यात येत असलेल्या पालखी महामार्गांचाही उल्लेख केला. विविध तीर्थक्षेत्रांसाठी केल्या जात असलेल्या कामांची यादीच मोदींनी यावेळी वाचून दाखवली. यावेळी पालखी मार्गाबद्दल मोदी म्हणाले,’ भगवान विठ्ठलाच्या लाखो भक्तांच्या आशीर्वादाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचं काम काही आठवड्यापूर्वी सुरू झालं आहे’, असं मोदी यावेळी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT