'राजस्थान काँग्रेसमधे मोठी घडामोड, तीन मंत्र्यांचं सोनिया गांधींना पत्र, राजीनामा देण्याची इच्छा'

अजय माकन यांनी दिली माहिती
'राजस्थान काँग्रेसमधे मोठी घडामोड, तीन मंत्र्यांचं सोनिया गांधींना पत्र, राजीनामा देण्याची इच्छा'

राजस्थान काँग्रेसमध्ये मोठी घडामोड झाल्याचं पाहण्यास मिळालं आहे. कारण काँग्रेसचे प्रभारी अजय माकन यांनी दिलेल्या माहितीनुसार आज रघु शर्मा, हरीश चौधरी आणि गोविंद सिंह डोटासरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते आता काँग्रेस संघटनेसाठी काम करू इच्छितात. या तिघांनीही यासंदर्भात सोनिया गांधींना पत्र लिहिलं आहे. दिवाळीच्या दरम्यान राजस्थान काँग्रेसमध्ये पक्षात काही फेरबदल करण्याचं ठरवण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर पूर्णतः बदल करायचा असं ठरलं. आता या पत्राकडे याच दृष्टीकोनातून पाहिलं जातं आहे.

राजस्थानचे प्रभारी महासचिव अजय माकन जयपूरला पोहचले होते. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थान सरकारमधे मोठा बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये सचिन पायलट यांचा गट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यात सातत्याने खटके उडत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पदाधिकारी आणि पक्ष यांच्यात संतुलन कसं ठेवता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पक्षातले नेते हे सांगत आहेत की दोन्ही गटांकडे लक्ष देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

काँग्रेस 2023 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. फेरबदल करत असताना निवडणुकीत कसा फायदा होईल याकडेही पाहिलं जातं आहे. अजय माकन यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे. राजस्थानच्या मंत्रिमंडळ विस्ताराचाही मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो असंही सांगितलं जातं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in