"गडकरी साहेब, काचा खाली करून प्रवास करा; या रस्त्याने अनेकांचं सौभाग्य हिरावून घेतलंय"
अहमदनगर जिल्ह्यातील तरुणाने थेट फोटो ट्वीट करत आपलं म्हणणं मांडलं आहे. Rahul k/Twitter

"गडकरी साहेब, काचा खाली करून प्रवास करा; या रस्त्याने अनेकांचं सौभाग्य हिरावून घेतलंय"

एका तरुणाने खड्डेमय महामार्गाबद्दलचं गाऱ्हाणं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत पोहोचवण्याच प्रयत्न केला आहे...

महाराष्ट्रात रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरातील रस्ते खड्ड्यांमध्ये गुडूप झाल्याची दृश्ये आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी चाळणीमय झालेले रस्ते नीट करण्याची मागणी केली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणाने खड्डेमय महामार्गाकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं लक्ष वेधण्यासाठी अनोखी शक्कल लढवली.

झालं असं की केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे शनिवारी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अहमदनगर शहरातील महामार्गांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. गडकरींच्या दौऱ्यांचं निमित्त साधत अहमदनगर जिल्ह्यातीलच नगर-मनमाड महामार्गाची झालेली चाळण एका तरुणाने ट्वीटरच्या माध्यमातून निर्दशनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.

या तरुणाने काय म्हटलंय?

राहुल कारले असं या तरुणांचं नाव आहे. नगर-मनमाड रस्त्यावरील खड्ड्याच्या प्रश्नसंदर्भात त्याने काही फोटो ट्वीट करत आपलं म्हणणं मांडलं आहे.

'नितीन गडकरी साहेब, आज आपण अहमदनगर जिल्ह्यात आहात, तर तेवढं नगर शहरातून बाहेर पडून पुढे शिर्डी-कोपरगावपर्यंत नगर-मनमाड रस्त्यावरून गाडीच्या काचा खाली करून प्रवास करावा, ही नम्र विनंती. आजवर या दळभद्री रस्त्यानं कित्येक माताभगिनींचं सौभाग्य हिरावून घेतलं आहे.'

'कित्येकजण गंभीर जखमी होऊन कायमचे अंथरुणाला खिळले आहेत. कित्येक गाड्या निकामी झाल्या आहेत. याला जबाबदार कोण साहेब? याला जबाबदार कोण? तुमच्या खात्याकडे खूप पैसे आहेत, असं तुम्ही सांगता ना, मग हा रस्ता गेल्या 4-5 वर्षांपासून या अवस्थेत का?', असा उद्विग्न सवाल त्याने उपस्थित केला आहे.

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने ठिकठिकाणी रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते दिसत नाही अशी अवस्था झाली असून, ठाण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्न समोर आल्यानंतर आता राज्यभरातून लोक खड्डेमय रस्त्यांबद्दलच्या तक्रारी करताना दिसत आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संदर्भात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सर्व संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांची बैठकही घेतली होती.

Related Stories

No stories found.