Goa new CM : गोव्याची सुत्रं पुन्हा प्रमोद सावंतांच्या हाती; पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील

Goa new CM : गोव्याची सुत्रं पुन्हा प्रमोद सावंतांच्या हाती; पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील

Pramod Sawant : होळीनंतर घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

गोवा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजप कुणाकडे राज्याची सूत्रे सोपवणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. प्रमोद सावंत यांच्यासह इतरही काही नावांची चर्चा होती. मात्र, भाजप दिल्लीतील पक्षश्रेष्ठीने प्रमोद सावंत यांच्याच नावाला हिरवा कंदील दाखवला आहे. भाजप पक्षश्रेष्ठीने गोव्याबरोबरच मणिपूरमधील मुख्यमंत्री न बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकीपैकी चार राज्यात भाजपने मोठा विजय मिळवला आहे. गोव्यातही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला गोव्यात बहुमताचा आकडा गाठता आला नसला, तरी इतरांच्या पाठिंब्यावर भाजप गोव्यात सत्ता स्थापन करणार आहे. भाजपला २० जागा मिळालेल्या असून, बहुमतासाठी २१ जागांची गरज आहे. दुसरीकडे काँग्रेस १२, तर तृणमूल काँग्रेस दोन आणि आम आदमी पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत.

गोव्यात पुन्हा एकदा भाजप सत्तेत विराजमान होणार असून, मुख्यमंत्रीपदी कोण असणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर या चर्चेवर पडदा पडला आहे. भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठीने पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांच्यावर विश्वास दाखवला आहे. प्रमोद सावंत यांच्या नावाला भाजपने हिरवा कंदील दर्शवला असून, सावंत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. होळीनंतर शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा भाजपच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनीही ट्विट करून याची माहिती दिली. गोव्यातील मतदारांनी पुन्हा एकदा भाजपला आशीर्वाद दिल्याबद्दल मोदींनी आभार मानले आहेत. त्याचबरोबर गोव्याच्या विकास करत राहू असंही म्हटलं आहे.

सावंत यांच्याबरोबर मणिपूरचे काळजीवाहू मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. मणिपूरच्या नागरिकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणखी मेहनत करण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

मणिपूरमध्ये विधानसभेच्या ६० जागांसाठी निवडणूक झाली. ६० पैकी ३२ जागा जिंकत भाजपने बहुमत मिळवलं असून, काँग्रेसला फक्त पाच जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे नागा पीपल्स फ्रंटने पाच जिंकल्या असून, नॅशनल पीपल्स पार्टीला सात जागा मिळाल्या आहेत. तीन अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. त्याचबरोबर कुकी पीपल्स अलायन्सला दोन आणि जनता दल संयुक्त पक्षाला सात जागांवर विजय मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in