प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर?; सोनिया गांधींना सांगितला ‘मिशन २०२४’चा प्लान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील अपयश झटकत काँग्रेस पुन्हा एकदा कामाला लागल्याचं दिसत आहे. काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. किशोर यांनी सोनिया गांधींसमोर आगामी निवडणुकीसंदर्भातील रणनीतीही मांडल्याची माहिती आहे.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत मानहानिकारक पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या बैठकांवर बैठका घेताना दिसत आहे. शनिवारीही सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी अचानक बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत पक्षाची सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचालीबद्दल महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

काँग्रेसच्या या बैठकीला राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या उपस्थितीबद्दल अनेकांनी भुवया उंचावल्या. सूत्रांनी दिलेल्या माहिती प्रमाणे प्रशांत किशोर यांनी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीबद्दल चर्चा केली. यासंदर्भात त्यांनी काँग्रेसध्यक्षांसमोर प्लान सादर केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काँग्रेसच्या एका नेत्याने इंडिया टुडेला नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, “प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. त्यांना पक्षाचे राजकीय सल्लागार म्हणून नव्हे तर पक्षाचे नेते म्हणून काम करण्यास सांगण्यात आलं आहे. त्यांनी (प्रशांत किशोर) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली. त्याचबरोबर २०२४ मधील लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षात काय काय बदल करायला हवेत, यावरही भाष्य केलं.”

कोणत्या राज्यांवर जास्त लक्ष्य केंद्रीत करायला हवं, याबद्दल प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला सांगितलं. ज्या ठिकाणी काँग्रेस मजबूत आहे, तिथेही लक्ष द्यायला हवं असं मतही त्यांनी बैठकीत सांगितलं. पक्षाच्या रचनेत विशेषतः कम्युनिकेशन विभागात संपूर्णपणे बदल करण्याची गरज असल्याचं मत किशोर यांनी या बैठकीत मांडलं.

ADVERTISEMENT

“बैठकीत प्रशांत किशोर यांनी आगामी निवडणुकीसंदर्भातील रणनीती मांडली. त्यावर पक्षाचे नेते विचार करणार आहेत,” असं के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितलं.

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी काँग्रेसने लोकसभेच्या ३७० जागांवर लक्ष्य केंद्रीत करायला हवं. इतर जागांवर युपीएमधील मित्र पक्षांनी निवडणूक लढवावी. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा या राज्यांमध्ये काँग्रेसने स्वबळावर लढावं आणि तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांत अन्य पक्षांशी आघाडी करण्याची सूचना किशोर यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल, अंबिका सोनी, दिग्विजय सिंह, मल्लिकार्जून खरगे, अजय माकन हे उपस्थित होते.

नुकत्याच लागेलल्या निवडणूक निकालांनंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होण्याचे संकेत मिळत असून, लांबणीवर पडलेला प्रशांत किशोर यांचा प्रवेशही लवकरच होण्याची चिन्हं आहेत. किशोर यांच्या प्रवेशाबद्दल आणि त्यांच्यावर पक्षाकडून काय जबाबदारी सोपवली जाईल, याबद्दल काँग्रेसकडून माहिती दिली जाणार आहे.

यापूर्वीही प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा झाल्या होत्या. त्यांच्या आधीही सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासोबत बैठका झाल्या होत्या. मात्र, पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीमुळे ही चर्चा थांबली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT