Devendra Fadnavis: 'गोपीचंद पडळकरांच्या केसालाही धक्का लागला तर...', फडणवीसांनी कोणाला दिला इशारा?
provide security bjp gopichand padalkar devendra fadnavis demands thackeray government ncp st bus strike

Devendra Fadnavis: 'गोपीचंद पडळकरांच्या केसालाही धक्का लागला तर...', फडणवीसांनी कोणाला दिला इशारा?

Devendra Fadnavis: ठाकरे सरकारने आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ सुरक्षा पोचवावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

नितीन शिंदे, पंढरपूर

'गोपीचंद पडळकर यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही सहन करणार नाही', असा इशाराच राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या ताफ्यावर रविवारी संध्याकाळच्या सुमारास तुफान दगडफेक करण्यात आली. ज्यामध्ये एका गाडीचं प्रचंड नुकसान देखील झालं. ज्यानंतर आता प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस वि. भाजप असा वाद पेटला आहे. दरम्यान, याचबाबत पंढरपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी पडळकरांना सरकारने सुरक्षा पुरवावी अशी मागी केली आहे.

'...तर आम्ही सहन करणार नाही'

पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'ज्या प्रकारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर भ्याड हल्ले होत आहेत. सरकारच्या विरोधात बोलाल तर आम्ही तुमच्यावर हल्ला करु ही मानसिकता चुकीची आहे. विरोधी पक्षाचं काम सरकारच्या विरुद्ध बोलणं आहे, सरकारचे घोटाळे बाहेर काढणंय. पण त्यांना टार्गेट केलं जातंय.'

'सरकारने आणि विशेषत: मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांना सुरक्षा द्यावी. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही सहन करणार नाही. याची पूर्ण जबाबदारी सरकारची असेल. त्यामुळे सरकारने सुरक्षा दिली पाहिजे.'

'आमच्या काळामध्ये अशाच प्रकारची धमकी ज्या वेळेस जितेंद्र आव्हाड यांना आली होती आणि पवार साहेब मला बोलले होते ते कुठल्या पक्षाचे आहेत याचा विचार न करता, आमच्याविरोधात काय बोलतात याचा विचार न करता तात्काळ त्यांना काळात सुरक्षा दिली होती. हे सरकारचं काम असतं. त्यामुळे गोपीचंद पडळकरांना सुरक्षा दिली पाहिजे.' असं फडणवीस म्हणाले आहेत.

'एसटी कामगारांचा संप मोडीत काढण्यासाठी सरकारची ठोकशाही सुरुय'

दरम्यान, सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने पडळकर यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. याचबाबत पडळकर यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'आम्ही सांगलीमध्ये चौकात गेलेलो असताना ठरवून आमच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. नंतर आमच्याचविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. राज्यात सध्या एसटी कामगारांचा संप सुरु आहे. तो मोडीत काढण्यासाठी सरकार सगळे प्रयत्न करत आहे. अशा वेळी 10 नोव्हेंबरला आम्ही मंत्रालयासमोर एसटी कामगारांचा मोर्चा काढणार आहोत. त्याच दृष्टीने हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारचे हे प्रयत्न सुरु आहेत.'

'आम्ही लोकशाही पद्धतीने सध्या आंदोलन करत आहोत. पण हे सरकार ठोकशाही पद्धतीने आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.' अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर पुन्हा एकदा तुफान दगडफेक झाली. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रविववारी सांयकाळी जोरदार राडा झाला. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजू जानकर हे जखमी झाले आहेत.

पडळकर यांनी आपल्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप राजू जानकर यांनी केला आहे. मुंबई तकच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, आटपाडीमधील साठे चौकात ही घटना घडली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमुळे सांगलीमधील राजकारण हे चांगलंच तापलं आहे. निवडणूक प्रचार देखील जोरात सुरु आहे.

अशातच गोपीचंद पडळकर आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे वातावरण आणखी चिघळलं आणि थेट दगडफेकीला सुरुवात झाली. यावेळी उमेदवार, मतदार पळवापळवीवरुनच वाद झाला असल्याचं समोर आलं आहे.

सोसायटी गटातील मतदार मेटकरी हे जानकर यांचे नातेवाईक आहेत. त्यावरुनच दोन गटात वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. पडळकर यांनी आपल्या अंगावर गाडी घातल्यामुळेच आपण जखमी झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजू जानकर यांनी केला आहे.

दुसरीकडे जानकर यांना दुखापत झाल्याचं समजताच आमदार पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाली. जेव्हा ही बातमी सगळीकडे पसरली तेव्हा तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील अनेक कार्यकर्त्यांनी आटपाडीकडे धाव घेतली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in