
चंदिगड: पंजाब पोलीस काही वेळापूर्वीच डॉक्टर कुमार विश्वास यांच्या घरी पोहोचले आहेत. पोलीस कुमार यांच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांनी ट्विट करून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना इशारा दिला आहे. कुमार विश्वास यांनी ट्विट करून सांगितले की, 'पंजाब पोलीस पहाटेच गेटवर आले आहेत. एकेकाळी माझ्यामुळेच पक्षात आलेल्या भगवंत मान यांना मी इशारा देत आहे की, दिल्लीत बसून ज्याला तुम्ही पंजाबच्या जनतेने दिलेल्या सत्तेशी खेळू देत आहात, तो एक दिवस तुमची आणि पंजाबची फसवणूक करेल. देशाने माझा हा इशारा लक्षात ठेवावा.'
दरम्यान, पंजाब पोलीस कुमार विश्वास यांच्या घरी नेमके का पोहोचले आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान कुमार विश्वास यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते. कुमार विश्वास यांनी दावा केला होता की, अरविंद केजरीवाल यांनी त्यांना सांगितले होते की, 'एक दिवस ते पंजाबचे मुख्यमंत्री किंवा स्वतंत्र राष्ट्राचे (खलिस्तान) पहिले पंतप्रधान होतील.'
गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता कुमार विश्वास यांच्या ताज्या वक्तव्यानंतर त्यांना सशस्त्र सुरक्षा पुरवली जाऊ शकते.
कुमार विश्वास यांच्या या दाव्यानंतर पंजाबसह देशभरातील राजकारण चांगलेच तापले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पंजाबमधील रॅलीत कुमार विश्वास यांच्या भाषणात त्यांच्या आरोपांचा उल्लेख केला होता.
पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचा भारत तोडण्याचा आणि सत्तेत येण्यासाठी फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी करण्याचा अजेंडा तयार आहे. मात्र, आम आदमी पक्षाने कुमार विश्वास यांच्या आरोपांना दुर्दैवी म्हटलं होतं.
केजरीवाल यांनी काय उत्तर दिलं होतं?
त्याचवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही कुमार विश्वास यांच्या आरोपांवर म्हटले होते की, आम आदमी पार्टीला पराभूत करण्यासाठी आणि भगवंतांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी सर्व भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत.
कवी कुमार विश्वास यांची खिल्ली उडवत अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, 'एका कवीने एके दिवशी अचानक एक कविता ऐकवली, त्यानंतर पंतप्रधानांच्या लक्षात आले आणि मला दहशतवादी म्हटले गेले.'
त्यावेळी केजरीवाल असंही म्हणाले होते की, 'विकासाबाबत बोलणारा दहशतवादी कधी पाहिला आहे का? जर मी दहशतवादी असेल तर कदाचित मी जगातील सर्वात गोड दहशतवादी असेल.' असं म्हणत त्यांनी कुमार विश्वास यांना सुनावलं होतं.