'अजित पवारांशी संबंधित आयकर छाप्यांचा भाजपशी संबंध जोडणे हास्यास्पद'

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य
'अजित पवारांशी संबंधित आयकर छाप्यांचा भाजपशी संबंध जोडणे हास्यास्पद'
फोटो मुंबई तक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या घरांवर किंवा कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. याचा संबंध भाजपशी जोडणं हे अत्यंत हास्यास्पद आहे असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. लखीमपूर खिरी प्रकरणात शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं. ज्यानंतर शरद पवारांनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग घटनेशी केली होती. तसंच मी अशी टीका केली म्हणूनच अजित पवारांशी संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या कार्यालयांवर छापेमारी झाली असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याची चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, गुरूवारी राज्यातील विविध ठिकाणी आयकर खात्याने मारलेले छापे गेले सहा महिने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे आहेत असं त्या खात्याने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अशा स्थितीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या लखीमपूर खिरी प्रकरणाबाबत शरद पवार यांनी खंबीर भूमिका घेतली म्हणून छापासत्र झाले असावे असे सांगणे हा मोठाच विनोद आहे. राज्यातील 25 निवासस्थाने आणि 15 कार्यालयांवरील छापे हे एकदोन दिवसांच्या तयारीने होऊ शकत नाही. आयकर खात्याने याबाबत बरीच तयारी केली असावी हे या कारवाईच्या व्यापक स्वरुपावरून दिसते.

त्यांनी सांगितले की, आयकर विभाग ही स्वतंत्र केंद्रीय यंत्रणा आहे. ती तिच्या पद्धतीने कायद्याच्या चौकटीत काम करत असते. आयकर विभागाने काही आर्थिक व्यवहार उघडकीस आणले तर त्याला कायदेशीर पद्धतीनेच उत्तर दिले पाहिजे. अशा छाप्यांचा संबंध भारतीय जनता पार्टीशी जोडून राजकीय रंग देणे आणि त्या आधारे स्वतःला निर्दोष ठरविण्याचा प्रयत्न करणे हास्यास्पद आहे.

लखीमपूर खीरी येथील घटनेनं अवघा देश हादरला. लखीमपूर खीरीत झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. घटना नेमकी कशी झाली याबद्दल प्रत्यदर्शीकडून सांगण्यात आलं. मात्र, आता या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. काँग्रेसनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान या व्हिडीओबद्दल पोलीस किंवा प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

लखीमपूर या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसाचाराबाबत देशभरातून संताप व्यक्त होतो आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या सगळ्या बाबत उत्तर प्रदेश सरकार आणि मोदी सरकार यांच्याकडून काही प्रतिक्रिया आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात जालियानवाला बाग सारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं याच वक्तव्याचा समाचार आता चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. असं वक्तव्य करणं हे हास्यास्पद आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.