
भोंगे काढण्याच्या मागणीवरून दिवसेंदिवस मनसे आक्रमक होताना दिसत आहे. पुणे दौऱ्यानंतर आज राज ठाकरेंनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीतच अक्षयतृतियेला राज्यभरात महाआरती करण्याचा कार्यक्रम ठरला आहे. त्याचबरोबर या बैठकीत इतर मुद्द्यांवरही चर्चा झाली. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी याबद्दलची माहिती दिली.
राज ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. "पक्षाचे नेते, सरचिटणीस आणि विभागांचे अध्यक्षांची आज राज ठाकरे यांनी बैठक घेतली. १ मे रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेची काय तयारी करायची याची बैठकीमध्ये माहिती देण्यात आली आहे. त्याप्रमाणे ती सभा मोठी होण्यासंदर्भात प्रत्येकाला सूचना करण्यात आल्या आहेत. ५ जून रोजी राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याचं नियोजन आमच्याकडून सुरू आहे. त्याबद्दल काही सूचना करण्यात आल्या आहेत," अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.
"३ मे रोजी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आमचे पदाधिकारी परवानगी घेऊन महाआरती करतील. अयोध्येच्या दौऱ्याबद्दल आम्ही आधी जाऊन पाहणी करून आलो आहोत. पुन्हा एकदा जाणार आहोत. त्यानंतर कशाप्रकारे नियोजन करायचं हे ठरवणार आहोत," असं नांदगावकर म्हणाले.
"सुरक्षेबद्दलची कल्पना राज ठाकरे यांना आहे. याबद्दल राज्य सरकारलाही पत्र दिलं आहे. ३ तारखेच्या अल्टिमेटबद्दल गृहमंत्र्यांची बैठक सुरू आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेणार ते पाहूया."
"मला असं वाटतं की सरकारच्या गाईडलाईन्स येईपर्यंत यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही. मार्गदर्शक नियमावली काय असणार. नियमावली आल्यानंतर आम्ही चर्चा करू आणि त्यावर काय करायचं हे नंतर ठरवू," असं नांदगावकर म्हणाले.
३ तारखेला अक्षय तृतीया आणि ईद आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा प्रश्नही नांदगावकर यांना विचारण्यात आला होता. "मला वाटतं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येक धर्मियांनी आपापले सण साजरे करावेत. आमचा काहीही आक्षेप नाही. फक्त कायद्याच्या चौकटीत राहुन साजरे करावेत. फक्त लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत," असं त्यांनी सांगितलं.
राज ठाकरेंच्या सुरक्षेबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिल्याच्या प्रश्नावर नांदगावकर म्हणाले, "लवकरच सुरक्षा प्रदान केली जाईल. पत्र दिलं गेलं आहे. सरकार याबद्दल गंभीर आहे. पूर्वी झेड दर्जाची सुरक्षा होती. आता वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. त्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती केली होती. आतापर्यंत काहीच झालेलं नाही," असं त्यांनी सांगितलं.