Corona: महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे, राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत राजेश टोपे?
Corona: महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे, राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे.

इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद

महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहिल हे सांगता येत नाही पण जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ही लाट कायम राहिल असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. जालना येथील पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांनी हे वक्तव्य केलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीला राजेश टोपे उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे.
लहान मुलांसाठी डेल्टापेक्षा जास्त घातक ठरू शकतो ओमिक्रॉन, काय म्हणत आहेत तज्ज्ञ?

नेमकं काय म्हणाले राजेश टोपे?

'राज्यात तिसरी लाट सुरू झालेली आहे. ती आता उच्चांक केव्हा गाठेल ते पाहायचं आहे. आज आपण बघतो आहोत की काल 45 हजार रुग्ण आढळले, आजही त्यात वाढ होईल. ही वाढ कुठपर्यंत जाईल, केव्हा उच्चांक गाठेल? जसं दुसऱ्या लाटेत दररोज 65 हजार रुग्ण आढळत होते. तो त्या लाटेचा उच्चांक होता. तसं या तिसऱ्या लाटेचा उच्चांक कोणता आहे? दररोज किती बाधित रुग्ण आढळतील, त्याचा अंदाज बांधणं कठीण आहे. तो कदाचित या महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा शेवटापर्यंत उच्चांक गाठेल असं वाटतं. त्यानंतर तो खाली जाईल असंही तज्ज्ञांचं मत आहे' असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

कोरोना चाचणी
कोरोना चाचणी(India Today)

महाराष्ट्र असो किंवा इतर राज्यं सध्या क्वारंटाईनचा कालावधी हा सात दिवसांचाच ठरवण्यात आला आहे. कुठे दहा दिवस, कुठे पाच दिवस असा कुठलाही प्रकार नाही. त्याचसोबत काही ठिकाणी आपले असेही प्रश्न आहेत की शाळेच्या बाबतीत आपण निर्णय घेतला आहे की शाळा बंद ठेवायच्या. त्यामध्ये ICMR चे डायरेक्टर जनरल यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही हे सांगितलं की जिथे पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्यावर जात असेल तिथे असा निर्णय घ्यावाच लागेल. आपला पॉझिटिव्हिटी रेट 15.5 टक्के आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. लोकांना संसर्गापासून रोखणं हाच आमचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे निर्बंध लावण्यात आले आहेत. मला या निमित्ताने जनतेला आणि विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना हे सांगायचं आहे की शाळा बंद झाल्या ही बाब सकारात्मक दृष्टीने बघा. कोरोना रूग्णवाढ हा काही कायम राहणारा विषय नाही. शाळा आपण सुरूही केल्या होत्या मात्र जानेवारीच्या अखेरीपर्यंत हा स्पाईक राहणार आहे असंही राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in