शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या साखर कारखानदाराला उमेदवारी देताना आम्हाला विचारात घेतलं का? – राजू शेट्टींचा सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भगिरथ भालकेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधला घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला उमेदवार जाहीर करत निवडणूकीमध्ये चूरस निर्माण केली आहे. स्वाभिमानीचे अधिकृत उमेदवार सचिन शिंदे-पाटील यांच्या प्रचाराचा नारळ आज राजू शेट्टी यांच्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी बोलत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्याला उमेदवारी देताना आम्हाला विचारात घेतलं होतं का असा सवाल विचारला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची भूमिका मान्य नसल्यामुळे पंढरपूरची पोटनिवडणूक लढवत असल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं. राज्य सरकारने शेतकऱ्यांची एफ.आर.पी आणि १०० युनिटपर्यंत घरगुती वीज बिल माफ करावं असं न झाल्यास सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही राजू शेट्टींनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी चर्चा सुरु असून उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याबद्दल मनधरणी सुरु असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. परंतू राजू शेट्टींनी पंढरपूरची निवडणूक लढवून राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोरची अडचण वाढवली आहे.

महाविकास आघाडीतून राजू शेट्टी बाहेर पडणार? रविवारी मोठी घोषणा?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जयंत पाटील आमच्या मागण्यांचा विचार करण्याबाबत बोलत आहेत, परंतू शेतकऱ्यांना एफआरपी आणि घरगुती वीज बील माफ करा याच आमच्या मागण्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या साखर कारखानदाराला उमेदवारी देताना आम्हाला विचारलं होतं का असाही प्रश्न राजू शेट्टींनी विचारला आहे. पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणूकीतले दोन उमेदवार हे साखर कारखानदार आहेत. त्यांच्याकडे निवडणूक लढवायला पैसे आहेत…परंतू शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत हे दुर्दैव असल्याची खंत राजू शेट्टींनी बोलून दाखवली. दरम्यान भाजपने या निवडणूकीसाठी समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष शैला गोडसे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या निवडणूकीत कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT