
शेतकऱ्यांचा दसरा कडवट झाला तर एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 20 वी ऊस परिषद 19 ऑक्टोबर रोजी जयसिंगपूरमध्ये आयोजित करण्यात आलीय. या परिषदेत एकरकमी एफआरपी मिळण्यासाठी लढाईचं रणशिंग फुंकलं जाईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते-माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी आणि इतर घटकांचा शासन नुकसान भरपाईअभावी दसरा कडवट झाल्यास राज्यातील एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिलाय. तर तीन टप्प्यांत एफआरपी देण्याच्या शासन निर्णयाचं समर्थन करताना इंग्रजी वाचनाची चांगली शिकवणी लावावी, असा टोला शेट्टी यांनी रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांना लगावलाय.
येत्या 15 ऑक्टोबरपासून राज्यातील ऊस गळीत हंगाम सुरू करण्याचं नियोजन शासनानं केलं असलं, तरी स्वाभिमानी शेतरी संघटनेची ऊस परिषद आणि त्यातील दरासंबंधीचा निर्णय झाल्याशिवाय कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत नाहीत, हा आजवरचा इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामधाम इथं झाली. यामध्ये शेट्टी यांनी जयसिंगपूर इथल्या 20 व्या ऊस परिषदेची घोषणा केली. यामध्ये 19 ऑक्टोबर रोजी ही परिषद होणार असल्याचं आणि त्यामध्ये एकरकमी एफआरपी लढ्याचं रणशिंग फुंकलं जाणार असल्याचं नमूद केलं.
दरम्यान 7 ऑक्टोबरपासून राज्यभर जागर एफआरपीचा, आराधना शक्तीपीठाची ही कोल्हापूर ते जेजुरी अशी शेतकरी यात्रा काढली जाणार आहे. याची सुरवात श्रीक्षेत्र जोतिबापासून सुरू होईल आणि राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळांचं दर्शन घेऊन, जेजुरीमध्ये दसर्यादिवशी शेतकरी मेळाव्यानं समारोप होईल, असं शेट्टी यांनी जाहीर केलं.
शुगर लॉबीच्या दबावाला बळी पडून केंद्र सरकार, निती आयोग, कृषीमूल्य आयोग यांनीच एफआरपीचे तीन तुकडे पाडले आहेत. प्रत्यक्षात भाजपनेच तीन तुकड्यांतील अनौरस बाळ जन्माला घातलंय. आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिलाय. आज पुण्यात भाजपचं एक रकमी एफआरपीसाठी आंदोलन झालं. पुढच्या महिन्यात संपूर्ण राज्यात हे आंदोलन होईल. मात्र स्वाभिमानी झोपली आहे असा गैरसमज कोणी करू नये, असंही शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. देशात कधी नव्हे ते साखर उद्योगाला चांगलं वातावरण आहे. उसाच्या रसापासून तयार होणार्या इथेनॉल निर्मितीचा निर्णय प्रोत्साहन देणारा आहे. आता कारखानादारांनी कोणतीही ओरड करू नये, असंही शेट्टी यांनी स्पष्ट केलं.