
किरीट सोमय्यांना अनिल परब यांच्याविषयीची सगळी माहिती रामदास कदम यांनी पुरवली असा आरोप खेडचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे. पुराव्यादाखल त्यांनी मोबाईलवरच्या ऑडिओ क्लिपच पत्रकार परिषदेत सादर केल्या. महाविकास आघाडीतही काही सूर्याजी पिसाळ तयार झाले आहेत असाही आरोप संजय कदम यांनी केला.
खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर व माजी आमदार संजय कदम यांची संयुक्त पत्रकार परिषद आज शनिवारी खेड येथे होती. यावेळी त्यांनी हे आरोप केले. यावेळी कदम म्हणाले की, आमची भूमिका ही कोकणातील पर्यटन व्यवसायाच्या बाजूने आहे. रामदास कदम आणि पालकमंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्यात वाद असतील तर त्यांनी परस्पर करावे मात्र यांचा वादाचा त्रास जर आमच्या पर्यटन व्यवसायिकांना होत आहे.
ही कोकणातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही असा इशाराही यावेळी संजय कदम यांनी दिला. प्रसाद कर्वे माहितीचा अधिकार वापरून काही गोष्टी करत असतील आणि रामदास कदम त्याचा उपयोग यासाठी करत असतील तर तो कर्वे यांनाही भविष्यात महाग पडेल, ज्यांनी मोबाईलवर कॉल रेकॉर्ड ठेऊन रामदास कदम यांना कॉल केला याचा अर्थ स्पष्ट असंही संजय कदम म्हणाले.
आम्ही यासंबंधीचे सगळे पुरावे आमच्या नेत्यांकडे दिले आहेत अशीही माहिती माजी आमदार संजय कदम यांनी दिली. किरीट सोमय्या यांची जर पुन्हा वक्रदृष्टी पडली तर आम्ही त्यांना रोखू असा इशारा मनसेचे कोकण विभागीय संघटक नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिला आहे.
रामदास कदम यांनी किरीट सोमय्यांना मदत केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेत एकच खळबळ उडाली. त्यानंतर रामदास कदम यांनी एका वृतवाहिनीशी बोलत असताना संजय कदम आणि वैभव खेडकर यांच्यावर जोरदार टीका केली.
अशी ही क्लिप पहिल्यांदाच आलेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा माझ्या आवाजात अशा क्लिप व्हायरल करण्यात आल्या होत्या. याबद्दल मी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला होता. संजय कदम आणि वैभव खेडेकर हे दोघेही शिवसेनेत होते. दोघांनी माझ्या हाताखाली काम केलं. दोघांनी शिवसेनेशी बेईमानी करून निघून गेले.
माझ्या भगव्या झेंड्याशी बेईमानी केली आणि गद्दारी केली आता त्यांना काळजी वाटत आहे' अशी टीका कदम यांनी केली. 'प्रसाद कर्वे हा माझा पीए नाही. तो एक हा सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याच्या सर्व पक्षांसोबत संबंध आहे. माझं त्यांचं असं काही बोलणं झालं नाही' असंही कदम म्हणाले.