'हा तर माझा साधेपणा..', भर सभेत रावसाहेब दानवेंनी दाखवला आपला फाटलेला शर्ट

Raosaheb Danve Pune Speech: रावसाहेब दानवे यांनी पुण्यातील भाषणात आपला साधेपणा काय आहे हे दाखविण्यासाठी थेट त्यांनी घातलेला फाटलेला शर्टच जाहीर सभेत दाखवला.
'हा तर माझा साधेपणा..', भर सभेत रावसाहेब दानवेंनी दाखवला आपला फाटलेला शर्ट
Raosaheb Danve Pune Speech

पुणे: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणजे राज्याच्या राजकारणातील एक मोकळंढाकळं व्यक्तिमत्वं. मनात येईल ते बोलून टाकणार. त्यामुळे कधी-कधी ते वादाच्या भोवऱ्यातही सापडतात. पण असं असलं तरी मतदारसंघात त्यांना बराच जनाधारही आहे. दरम्यान, पुण्यातील एका जाहीर सभेत पुन्हा एकदा रावसाहेब दानवेंचा मोकळे ढाकळेपणा पाहायला मिळाला.

'माझा शर्ट फाटलेला होता. तोच मी घालून आलो.. याला म्हणतात साधेपणा. म्हणूनच मला लोकं वारंवार निवडून देतात.' असं म्हणत रावसाहेब दानवेंनी पुण्यातील सभेत आपल्या मोकळ्या ढाकळ्या शैलीत तुफान फटकेबाजी केली.

रावसाहेब दानवेंची पुण्यातील सभेत जोरदार फटकेबाजी

  • 'मी फाटलेला शर्ट घालतो, याला म्हणतात आम आदमी'

'मी केंद्रात तीनदा मंत्री झालो आणि प्रदेशाचा अध्यक्ष झालो तरी साधेपणा मी सोडला नाही. काल मी हैदराबादला आमच्या मित्राकडे गेलो ते म्हणाले दादा खादीचे कपडे घ्या. म्हणे तुमचा शर्ट फाटलाय. मी म्हटलं शर्ट फाटला तर काय फरक पडला. तुम्ही पुण्याची माणसं आहात. मला सांगा इथे कोणी फाटलेला शर्ट घालून आलेला माणूस आहे का. पण हे बघा माझा शर्ट फाटलेला आहे. याला आम आदमी म्हणतात. त्यामुळेच लोकं मला एवढ्या वेळा निवडून देतात.' असं रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले.

  • 'आजारी असतानाही मी साडेतीन लाखाच्या फरकाने निवडून'

'मी आजारी होतो तेव्हा माझ्या मतदार संघात देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. मी जाऊ शकलो नाही. आजारी असताना मी प्रचार करू शकलो नाही तरीही भरघोस मतांनी मी निवडून आलो. शेवटी काय तुमची राहणी, वागणं, व्यवहार यामुळे माणूस कुठच्या कुठे जाऊ शकतो.'

'निवडणुकी दरम्यान आजारी असतानाही मी साडेतीन लाखाच्या फरकाने निवडून आलो. त्यावेळी निवडून आल्याचे प्रमाणपत्र घेण्यावेळी अर्जुन खोतकर आणि बबनराव लोणीकर सोबत होते. त्यावेळी लोणीकर म्हणाले एकही सभा न घेता इतक्या मोठ्या फरकाने दानवे निवडून कसे आले? त्यावर खोतकर म्हणाले, लोकांना वाटले असेल हा लई सिरीयस असेल शेवटचं मत देऊन टाकावं म्हणून निवडून आले असतील.' असं स्वत: दानवेंनी मिश्किल शैलीत यावेळी सांगितलं.

दरम्यान, या भाषणाला उपस्थितांनी देखील चांगलाच प्रतिसाद दिला. दुसरीकडे याच सभेला राज्यसभा खासदार संभाजीराजे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील आपल्या भाषणात रावसाहेब दानवे यांचं तोंड भरून कौतुक केलं.

Raosaheb Danve Pune Speech
CM Uddhav Thackery यांनी कानात काय सांगितलं? रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले....
  • 'माणूस काही उगीच पॉप्युलर होत नाही'

'नरेंद्र मोदींसह अनेकजण रावसाहेब दानवेंना राज्यमंत्री म्हणतात मात्र आमच्या दृष्टीने ते कॅबिनेट मंत्रीच आहेत. रावसाहेब दानवे यू-ट्यूबवर आणि इतरही माध्यमात प्रसिद्ध आहेत. माणूस काही उगीच पॉप्युलर होत नाही, त्यांच्यात ती पॉप्युलीरिटी आहे.' असं संभाजीराजे यावेळी म्हणाले.

  • 'सगळ्यांचे पत्ते कट झाले पण दानवेंचा पत्ता कट होत नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे'

'सगळ्यांचे पत्ते कट झाले पण दानवेंचा पत्ता कट होत नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे.' असं म्हणत संभाजीराजे यांनी यावेळी रावसाहेब दानवेंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, या जाहीर सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांच्यातील एक मोकळाढाकळा राजकारणी राज्यातील जनतेला पाहायला मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in