
मुंबई: 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पण ज्यावेळी राणा दाम्पत्यांना अटक करुन खार पोलिसात नेण्यात येत होतं तेव्हा रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिविगाळ केली आहे.
खार पोलीस ठाण्यात नेत असताना पायऱ्यांवर राणांकडून मुख्यमंत्र्यांना शिविगाळ करण्यात आली. 'उद्धव ठाकरे हिXX आहे, त्याची सेना हिXX आहे.' असे अपशब्द रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वापरले आहेत.
हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी आलेल्या रवी राणा यांना अटक केल्यानंतर त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना शिविगाळ केली. त्यामुळे आता राणांच्या अडचणीत वाढ होण्याची अधिक शक्यता आहे.
दरम्यान, राणांनी मुख्यमंत्र्यांना शिविगाळ केल्याचं समोर आल्यानंतर शिवसेना नेत्यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'आमचे वरिष्ठ लोक याबाबतीत लक्ष घालतील. त्याच पद्धतीने त्यांच्याविरोधात पुन्हा तक्रार दाखल करु शकतो. कारण अशा पद्धतीने अटक झाल्यानंतर एक तर तुम्हीच बंड पुकारलं, तुम्हीच दंड थोपटून आलात. आता आहे ते भोगायची तयारी पाहिजे.' अशी प्रतिक्रिया मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणकेर यांनी दिली आहे.
तर याच विषयी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देखील प्रचंड संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, 'आता तरी देशाला कळू दे की, यांचं चरित्र आणि चारित्र्य काय आहे ते. इतकी घाणरेडी माणसं आहेत की, त्यांच्या आयुष्यात सगळं बेकायदेशीर आहे. जातीचा खोटा दाखला देऊन ती खासदार झाली. त्यांनी निवडणुकीत सर्वाधिक खर्च करुन तो निवडून आला. ती तक्रार स्वत: निवडणूक आयोगाने केली आहे.'
'ज्यांच्या मुळातच असा खोटारडेपणा आहे ते पुढे काय करतील? अशी चारित्र्य असलेली माणसं आम्हाला चारित्र्य शिकवणार. ज्यांच्या आयुष्यात हिंदुत्व हा शब्द आला नसेल.' असं म्हणत त्यांनी राणा दाम्पत्याविरोधात आपला संताप व्यक्त केला.
शिविगाळ प्रकरणी राणांविरोधात तक्रार दाखल होणार
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना केलेल्या शिविगाळ प्रकरणी पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे आमदार रवी राणांविरोधात तलासरी पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत. या तक्रारीनंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी त्यांची मागणी आहे. यामुळे आता रवी राणा यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.