'त्रिपुरा घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटणं योग्य नाही, दुकानदार आणि व्यापाऱ्यांची चूक तरी काय?'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला प्रश्न
शरद पवार
शरद पवार

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

त्रिपुरातल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटणं योग्य नाही. दुकानदार आणि व्यापाऱ्यांची यामध्ये चूक काय? असा प्रश्न आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरमध्ये विचारला. रझा अकादमी यामागे होती असं माझ्या वाचनात आलं मात्र फॅक्ट काय ते मला माहित नाही. मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती केली आहे की या प्रकरणाचा तपास व्हावा. जे लोक गैरसमज आणि अफवा पसवरत आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

निवडणुका समोर आल्यानंतर अशा प्रकारचा हिंसाचार झाला अशी शंका लोकांना येते आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या विषयात खोलात जाण्याची गरज आहे. रझा अकादमीच्या बाबतीत पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय मी त्यांच्यावर बंदी आणावी असं मी म्हणत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर जी प्रतिक्रिया दिली ती उथळ पणाची आहे. संवेदनशील प्रकरणावर विचार करून बोललं पाहिजे. फडणवीस यांची सत्ता गेल्यानंतरची अस्वस्था इतक्या टोकावर जायला नको असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार
अमरावती हिंसाचार : चिथावणी देणाऱ्या 36 पोस्ट सायबर पोलिसांच्या हाती; वाचा काय आहे पोस्टमध्ये?

अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी त्रिपुरातल्या घटनेचे पडसाद उमटले. त्यामुळे अडचणीही निर्माण झाल्या. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. समस्या कोणतीही असो त्यावर अशा प्रकारे प्रतिक्रिया येणं ही बाब योग्य नाही. अशा हिंसाचाराचा सर्वात वाईट परिणाम हा व्यवसाय आणि उद्योगांवर होतो असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. त्यासाठी काही लोकांनी कायदा हातात घेतला ही बाब योग्य नाही अशा घटनांमध्ये विनाकारण व्यापाऱ्यांचं नुकसान होतं. हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे. अमरावती प्रकरणाबाबत नवाब मलिक हे जे बोलले त्याबाबत माझी आणि त्यांची भेट झाली नाही. मी त्यांच्याशी मुंबईला गेल्यावर चर्चा करणार आहे असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. नवाब मलिकांनी या प्रकरणी भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप केला होता. तसंच ही दंगल भाजपने घडवून आणल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता शरद पवार यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in