'अनिल देशमुख-अनिल परब ही तर प्यादी, खरे सूत्रधार सिल्वर ओक आणि वर्षावर बसलेत !'

ईडीच्या छापेमारीनंतर भाजपचा पवार-ठाकरेंवर हल्लाबोल
'अनिल देशमुख-अनिल परब ही तर प्यादी, खरे सूत्रधार सिल्वर ओक आणि वर्षावर बसलेत !'

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील राहत्या घरांवर आज ईडीने छापेमारी केल्यामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं वाकयुद्ध महाराष्ट्रात सुरु असताना भाजपने यावरुन उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

आज ईडीची जी कारवाई झाली ते अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही तर प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्वर ओक आणि वर्षावर बसलेत असा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

अनिल देशमुखांच्या नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. ईडीकडून एकीकडे अनिल देशमुखांच्या नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना दुसऱ्य़ा टीमने वरळीच्या सुखदा इमारतीमधील घरावरही छापा टाकला आला असून झाडाझडती सुरु आहे. ११ मे रोजी ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दुसरीकडे सीबीआयनेही अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला असून तपास सुरु आहे. सीबीआयकडून अनिल देशमुख यांची चौकशीदेखील करण्यात आली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरचा अभ्यास केल्यानंतर ईडीने गुन्हा दाखल करत कारवाईला सुरुवात केली होती.

दरम्यान भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुखांची रवानगी लवकरच जेलमध्ये होणार आहे असं म्हटलंय. अनिल देशमुखांनी घोटाळ्याचा पैसा हा कोलकात्यामधील बोगस कंपन्यांद्वारे आपल्या परिवाराच्या नावावर असलेल्या लोकांकडे वळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. याच प्रकरणात छगन भुजबळ ३ वर्ष जेलमध्ये होते, आता अनिल देशमुख आणि अनिल परबांची अवस्थाही अशीच होणार असल्याचं सोमय्या म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in