'पुरणपोळी' अन् 'बिल': रोहित पवारांचा 'एका ट्विटमध्ये दोन भाजप नेत्यां'वर निशाणा

रोहित पवारांनी ३५ मिसळ खाण्याचा मोह का टाळला? : बिलावरून कुणाला काढला चिमटा?
'पुरणपोळी' अन् 'बिल': रोहित पवारांचा 'एका ट्विटमध्ये दोन भाजप नेत्यां'वर निशाणा

मागील आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा एक किस्सा बराच गाजला. तो होता पुरणपोळीच्या आवडीबद्दलचा. तर दुसरी गोष्ट घडली केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान, ती होती बिल न दिल्याची. या दोन्ही घटनांवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एकाच ट्विटमध्ये दोन भाजप नेत्यांना लक्ष्य केलं. रोहित पवारांच्या मार्मिक ट्वीट आता चर्चेत आलं आहे.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या रोहित पवार यांनी सोमवारी एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये रोहित पवारांनी काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये रोहित पवार नाश्ता करताना दिसत असून, त्यांच्याबरोबर कार्यकर्तेही आहेत.

हे फोटो ट्विट करतानाच रोहित पवारांनी हा प्रसंगही सांगितला आहे. पण, प्रसंग सांगतानाच रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांना अप्रत्यक्षपणे चिमटाही काढला.

ट्विटमध्ये काय म्हटलं आहे?

"मतदारसंघात असताना भूक लागल्याने माही जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली. एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने '३५' मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनंच कसंतरी झालं... आणि हो मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही, तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलं", असं म्हणत रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांना टोला लगावला.

फडणवीस आणि ३५ पुरण पोळ्यांचा किस्सा काय?

रोहित पवारांनी ३५ मिसळचा उल्लेख करत फडणवीसांना टोला लगावला. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना "देवेंद्रजी, एका बैठकीत किती पुरणपोळ्या खाऊ शकतात?", असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना "ते ३०-३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे", असं उत्तर अमृता फडणवीसांनी दिलं होतं.

'पुरणपोळी' अन् 'बिल': रोहित पवारांचा 'एका ट्विटमध्ये दोन भाजप नेत्यां'वर निशाणा
पातेलंभर तूप आणि ३०-३५ पुरणपोळ्या, अमृता फडणवीसांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांचं गुपित

बिल न दिल्याचं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमानिमित्ताने ठाण्यात आलेले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह काही कार्यकर्ते एका हॉटेलमध्ये गेले आणि तेथे त्यांनी वडा आणि भजीपावचा नाश्ता केला. चहा, नाश्ता झाल्यानंतर हॉटेलचे बिल न देता मंत्री निघून गेले होते. याची चर्चा झाल्यानंतर बिल भरण्यात आलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in