
वसंत मोरे, बारामती
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षाचे आमदार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार यांचे बारामतीतील भर सभेतच कान टोचले आहेत. मास्क न लावण्यावरुन अजित पवार यांनी रोहित पवारांना थेट सुनावलं आहे. 'तू आमदार आहेस जर तूच मास्क नाही लावला तर मी इतरांना काय बोलणार?' अशा शब्दात अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावलं आहे.
पाहा नेमकं काय म्हणाले अजित पवार
'कोरोनाशी मुकाबला करत असताना मास्क वापरणं आवश्यक आहे. अजूनही काही काही जण मास्क वापरत नाही. काल तर मी बघितलं इतके जणं त्या कर्जत-जामखेडला मास्कच वापरत नव्हते. रोहितच वापरत नव्हता. रोहितला म्हटलं अरे शहाण्या तू आता आमदार आहेस तू वापर ना. तू वापरला तर मला बाकिच्यांना सांगता येईल.'
'मी तर भाषण करताना देखील मास्क काढत नाही राव... आणि तू मास्क वापरत नाही. हे बरोबर नाही. जर तिसरी लाट आली ना तर त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल.' असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवारांचे कान उपटले.
सध्या राज्यात कोरोनाची रुग्णांची संख्या ही आटोक्यात आली आहे. अशावेळी आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. मात्र, आता अनेक जण बेफिकीर झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाची पुन्हा लाट येऊ नये यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील असणं आवश्यक आहे. त्यामुळे जरी लसीकरण झालेलं असेल तरीही सर्वांना मास्क वापरणं गरजेचं आहे. असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. बारामतीत रघुनंदन पतसंस्थेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते.
राज्यातील जनतेला जातीय सलोखा राखण्याचंही आवाहन
दरम्यान, याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला जातीय सलोखा राखण्याचं देखील आवाहन केलं आहे.
'नांदेड, अमरावती, मालेगाव येथे झालेल्या जातीय दंगलीमध्ये काही समाजकंटकांनी गैरफायदा घेतला. मात्र, सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा.' असं म्हणत अजित पवार यांनी नांदेड अमरावती आणि मालेगाव मध्ये झालेल्या जातीय दंगलींबाबत चिंता व्यक्त केली आहे.
काही समाजकंटकांनी जातीय दंगलीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला काही. त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. आपल्याला विनंती आहे की, आपली एका परंपरा आहे.. ती परंपरा पाळणं, जातीय सलोखा राखणं आवश्यक आहे. असं अजित पवार यावेळी म्हणाले.