'वचनाची पूर्तता करण्याची वेळ आलीये!'; कश्मिरी पंडितांच्या घरवापसीबद्दल सरसंघचालकांचं विधान

द कश्मीर फाईल्स चित्रपटामुळे विस्थापित झालेल्या कश्मिरी पंडितांचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे...
'वचनाची पूर्तता करण्याची वेळ आलीये!'; कश्मिरी पंडितांच्या घरवापसीबद्दल सरसंघचालकांचं विधान

कश्मिरातून विस्थापित झालेल्या कश्मिरी पंडितांची घरवापसी कधी होणार? असा प्रश्न द कश्मीर फाईल्स चित्रपटामुळे उपस्थित होत असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी याबद्दल मोठं विधान केलं आहे. कश्मिरी पंडित लवकरच कश्मिरात परत जाऊ शकतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी तीन दिवसीय नवरेह उत्सव कार्यक्रमात बोलताना हे विधान केलं. अखेरच्या दिवसी मोहन भागवत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केलं. द कश्मीर फाईल्स चित्रपटाचं कौतुक करताना मोहन भागवत म्हणाले, "कश्मिरी पंडितांना पुन्हा कश्मिरातून बाहेर काढण्याचा कुणाचा हेतू असेल, तर त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील. कश्मीर फाईल्स चित्रपटाने कश्मिरी पंडितांच्या स्थलांतरामागील वस्तुस्थितीबद्दल भारतात आणि जगभरात जनजागृती केली आहे."

"कश्मिरी पंडितांची कश्मिरात घरवापसी करण्याच्या वचनाची पूर्तता करण्याची वेळ आली आहे. तुमच्या कश्मिरातील घरवापसीची वेळ आली आहे, कारण हिंदू आणि भारत भक्त तुमच्या जवळ येत आहेत. भूतकाळात आपल्यावर विस्थापित होण्याच्या वेदना भोगल्या मात्र भविष्यात अशी वेळ येता कामा नाही. तसं वातावरण तयार करण्याचं काम सुरू आहे. असं वातावरण ज्यात तुम्हाला सुरक्षित वाटेल आणि शेजाऱ्यांसोबत शांतीपूर्ण राहू शकाल. जसे पूर्वी राहत होतात. कुणीही तुम्हाला पुन्हा कश्मिरातून बाहेर काढू शकणार नाही," असं मोहन भागवत म्हणाले.

"जर कुणीचा हेतू ठेवला तर त्याला त्यासाठीचे परिणाम भोगावे लागतील. असेही लोक आहेत, ज्यांच्यासोबत तुम्ही आनंदाने राहत होतात. आपल्याला कट्टर धर्मियांना पराभूत करायचं आहे आणि सर्वांना शांततेत जगायचं आहे."

कश्मीर खोऱ्यात घरवापसी करण्याचं आमचं वचन पूर्ण करण्यासाठी जास्त दिवस लागणार नाही. ते लवकरच सत्यात उतरणार आहे. आपल्या या दिशेनं प्रयत्न सुरू ठेवावे लागतील. आपला इतिहास आणि आपले महान नेते आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतील आणि प्रेरणा देत राहतील", असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.

"प्रत्येकाच्या आयुष्यात आव्हान येत असतात. तीन-चार दशकांपूर्वी तुम्हालाही आपल्याच देशात विस्थापित व्हावं लागलं. यावर समाधान काय आहे? आम्ही हार मानणार नाही आणि पुन्हा स्वतःच्या घरी पोहोचून वचनाची पूर्तता होताना बघणार आहोत", असं सरसंघचालक म्हणाले.

इस्रायल आणि ज्यूंचं दिलं उदाहरण

सरसंघचालकांनी यावेळी इस्रायल आणि ज्यू धर्मीय लोकांचाही दाखला दिला. "ज्यूंनी स्वतःच्या मातृभूमीसाठी १८०० वर्षांपर्यंत संघर्ष केला. १७०० वर्षांपर्यंत वचन पूर्ण करण्यासाठी त्यांना काहीही करता आलं नाही, पण मागील १०० वर्षांच्या इस्रायलच्या इतिहासात त्यांनी लक्ष्य प्राप्त केलं आणि जगातील आघाडीच्या देशांपैकी एक देश बनला. आपल्यालाही (कश्मिरी पंडितांना) जगाच्या वेगवेगळ्या भागात राहावं लागलं. कश्मीर भारताचं अविभाज्य अंग असतानाही हे करावं लागलं. आपण कुठेही राहू शकतो, मात्र मातृभूमीला विसरू शकत नाही," असं मोहन भागवत यावेळी बोलताना म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in