
पुणे: 'पुण्यातील रिकामटेकड्या नेत्यांमुळे मला त्रास झाला आहे. त्यामुळे त्यांना योग्य उत्तर द्यायला त्याच स्टाइलमध्ये रुपाली पाटील उभी असेल.' असं म्हणत पुण्यातील मनसेच्या माजी नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी एल्गार केला आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
मनसेला 'जय महाराष्ट्र' केल्यानंतर रुपाली पाटील या कोणत्या पक्षात जाणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. मात्र, त्याबाबत अद्याप तरी कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही. पण, आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून ऑफर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाल्या रुपाली पाटील?
'मनसेमध्ये निस्वार्थी कार्यकर्ते, प्रचंड प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. त्या सगळ्यांना मला भरभरुन प्रेम दिलं. पण लोकांना न्याय देताना खंबीरपणे साथीची गरज असते. मी ते सन्माननीय राज ठाकरेंपर्यंत पोहचवलेलं आहे. त्यामुळे मला कुठे तरी जायचंय म्हणून मनसेला बदनाम करेल, राज ठाकरेंबद्दल बोलेल, पक्षाबद्दल अशी मी स्वार्थी नाही.'
'आता मला त्या गोष्टी परत-परत बोलून वातावरण दूषित सुद्धा करायचं नाही. त्यामुळेच मी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. कारण बदल जर कोणामध्ये घडत नसेल तर मला माझ्यामध्ये बदल करुन घ्यावा लागेल. पण राज ठाकरे हे माझे दैवत आहेत आणि राहतील.'
'मनसेमध्ये काय बदल व्हायला पाहिजे ते राज ठाकरे ठरवतील. कारण त्यांना सल्ला देण्याऐवढी मी काय मोठी नाही.'
'मनधरणी सगळेच जण करतात. मी 14 वर्ष पक्षात काम केलेलं आहे. परंतु मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आहे. नव्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत मी निर्णय घेतलेला नाही. मला वेगवेगळ्या पक्षातून ऑफर आलेल्या आहेत. पण त्याबाबत निर्णय झाल्यानंतर मी तुम्हाला त्याबाबत माहिती देईन.'
'संदीप देशपांडे असतील किंवा आणखी कोणी असेल आम्ही भावंड म्हणून काम केलं आहे. मी आता त्यांना उत्तर देणं म्हणजे अजून त्यांना दुखवणं असं होईल. योग्य वेळी मी त्यांना उत्तर देईन. कारण मी देखील त्यांचीच बहीण आहे. त्यांच्याच साच्यात वाढलेली आहे. त्यामुळे ठीक आहे त्यांना वाटलं असेल दु:ख किंवा एक बंधू म्हणून ते ट्विटरवर व्यक्त झाले असतील. पण मी आता त्यांना काही बोलू इच्छित नाही.'
'वसंत मोरे असतील, संदीप भाऊ असतील... त्यांना दु:ख झालं असेल म्हणून त्यांनी या भावना व्यक्त केल्या असतील. आम्ही भावंडं म्हणून काम केलेलं आहे. योग्य वेळ आल्यावर मीही त्यांना उत्तर देईन.'
'मी ज्या काही गोष्टी आहेत त्या राज ठाकरेंपर्यंत पोहचवल्या आहेत. शेवटी लक्षात घ्या काम करत असताना खेळीमेळीच्या वातावरणातच काम होणं गरजेचं असतं. मी पक्षाला, पक्षश्रेष्ठींना कधीही बोलू शकत नाही. परंतु इतर जण जे काही आहेत त्यांचा जो काही त्रास आहे ते मी राज ठाकरेंपर्यंत पोहचवलेला आहे.'
'पक्षाने मला खूप काही दिलं आणि मी पक्षाला काय दिलं हे मनसैनिक सांगतील. माझा हा वादच नाही की, मला काही मिळालं नाही. पण मी वैयक्तिक कारणातून पक्ष सोडला आहे.'
'ज्या पद्धतीने मी काम करत होते त्या पद्धतीनेच मला जर राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेनेने स्वीकारलं तरच मी जाणार आहे. दोन पर्याय सध्या तरी आहेत. तिसरा पर्याय आला तर नक्कीच सांगेल मी तुम्हाला. परंतु सध्या तरी मी माझ्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार आहे.'
'माझ्यावर पक्ष सोडण्याची वेळ का आली हे मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. यावर किती चर्चा करायची, बोलायचं याला काही तरी बंधनं आहेत.'
'भाजपकडून मला सध्या तरी कोणती ऑफर नाही. 2017 साली ती ऑफर होती. पण ती मी स्वीकारली नव्हती. शेवटी पक्ष आणि राज ठाकरे यांच्यावरचं प्रेम म्हणून मी ती ऑफर नाकारली होती.'
'ज्या काही नेत्यांमुळे या पातळीपर्यंत यावं लागलं ते मी राज ठाकरेंपर्यंत पोहचवलं आहे. मी बेधडक होते. मी बेधडक होते, बेधडक आहे. पक्ष सोडल्यानंतर ही पहिली पत्रकार परिषद आहे. त्यामुळे सगळं आज काही बोलणार नाही. मला कोणालाही बदनाम करुन जायचं नाही. पण येत्या काळात ज्या पुण्यातील रिकामटेकड्या नेत्यांमुळे मला त्रास झालाय त्यांना योग्य उत्तर द्यायला त्याच स्टाइलमध्ये रुपाली पाटील उभी असेल.'
'राज ठाकरेंच्या भेटीचा फोन आला तर विचार करेन. पण आता राजीनामा दिला म्हटल्यावर पूर्ण विचार करुनच राजीनामा दिलाय. तसं मला राज ठाकरेंना भेटायला कधीही आवडेल. याआधीही मी राज ठाकरेंची अनेकदा सदीच्छा भेट घेत आहे.' असं म्हणत रुपाली पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.