'प्रभाकर साईल याचा मनसुख हिरेन झाला का?', 'सामना'तून थेट भाजपवरच निशाणा

Prabhakar Sail Death: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल याच्या मृत्यूप्रकरणी शिवसेनेने 'सामना'तून थेट भाजपवर निशाणा साधला आहे.
'प्रभाकर साईल याचा मनसुख हिरेन झाला का?', 'सामना'तून थेट भाजपवरच निशाणा
saamana editorial shiv sena directly targeted bjp over prabhakar sails death(फाइल फोटो)

मुंबई: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल याचा काही दिवसापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पण हा मृत्यू संशयास्पदरित्या झाला असल्याचा म्हणत आता शिवसेनेने याबाबत आपलं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून थेट भाजपवर निशाणा साधला आहे.

'प्रभाकरचे काय झाले? त्याचा मनसुख हिरेन झाला काय? असे प्रश्न भाजपच्याच गोटातून निर्माण व्हावेत. त्यामुळे संशयाचा भोवरा जिथे फिरायचा त्याच दिशेने फिरताना दिसत आहे. धाडसाने जे सत्य बोलत आहेत ते एकतर तुरुंगात ढकलले जात आहेत किंवा प्रभाकर साईलप्रमाणे संशयास्पदरीत्या मरण पत्करत आहेत.' असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

पाहा 'सामना'च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

  • भाजपचे लोक पायाखाली चिरडलेल्या मुंगीच्या बाबतीतही शोक संवेदना व्यक्त करून ठाकरे सरकारला जाब विचारतात , पण प्रभाकर साईलच्या संशयास्पद मृत्यूमुळे त्यांना साधी हळहळ वाटू नये याचे आश्चर्य वाटते.

  • एनसीबीचे अधिकारी ज्या भाजप पुढाऱ्यांबरोबर त्या काळात ऊठबस करीत होते, त्यांनी प्रभाकर साईलच्या मृत्यूबाबत समाजमाध्यमांवर व्यक्त केलेल्या भावना रहस्यमय तितक्याच संशयास्पद आहेत. प्रभाकर साईलचा मृत्यू रहस्यमय आहे या संशयास त्यामुळे बळकटीच मिळते. प्रभाकरचे काय झाले? त्याचा मनसुख हिरेन झाला काय? असे प्रश्न भाजपच्याच गोटातून निर्माण व्हावेत. त्यामुळे संशयाचा भोवरा जिथे फिरायचा त्याच दिशेने फिरताना दिसत आहे.

  • धाडसाने जे सत्य बोलत आहेत ते एकतर तुरुंगात ढकलले जात आहेत किंवा प्रभाकर साईलप्रमाणे संशयास्पदरीत्या मरण पत्करत आहेत. महाराष्ट्राच्या गृहखात्याने हे आव्हान स्वीकारायला हवे.

  • मारुती कांबळेचे काय झाले? या प्रश्नाप्रमाणेच प्रभाकर साईलचे काय झाले? तो का मेला? असे प्रश्न सगळय़ांना पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी नागपुरातून अॅड. सतीश उके यांना 'ईडी'ने एका जमीन घोटाळा प्रकरणात अटक केली. जमीन घोटाळा हे निमित्त आहे. अॅड. उके यांच्या अटकेचे कारण राजकीय दहशत निर्माण करणे हेच आहे. अॅड. सतीश उके यांनी गंभीर अपराध, आर्थिक किंवा जमीन घोटाळे केले हे मान्य केले तरी ईडीने पहाटे घुसून त्यांना जेरबंद करण्यासाठी मनी लॉण्डरिंग, हवाला, स्मगलिंगसारखी ती प्रकरणे नव्हती.

  • महाराष्ट्राचे पोलीस अशा प्रकरणांचा तपास करून गुन्हेगारांना शासन करण्यास समर्थ आहेत. पोलीस कमी पडले असते तर विरोधी पक्षाने त्या विरोधात आवाज उठविला असता, पण सतीश उके यांना 'ईडी'ने ताब्यात घेतले व तुरुंगात डांबले. सतीश उके यांनाही आपल्या जिवाची भीती वाटत आहे. त्यामुळे गृहमंत्री वळसे-पाटील यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहायलाच हवे. सतीश उके यांना जेरबंद केल्यावर प्रभाकर साईलचा आवाज कायमचा बंद केला आहे.

  • प्रभाकर साईल कोण, हे एव्हाना लोकांच्या लक्षात आलेच असेल. शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान याचे कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण गाजले होते. आर्यनला ड्रग्ज प्रकरणात सरळ सरळ फसविण्यात आले. आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्जचे सेवन केले नाही.

  • तरीही एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यनला अटक करून सनसनाटी निर्माण केली. याच प्रकरणात खंडणी मागण्याचाही प्रकार घडला. आर्यनला कसे फसवले, एनसीबीचे अधिकारी धनिकांना खोटय़ा प्रकरणांत कसे अडकवत आहेत, याचा पर्दाफाश प्रभाकर साईल याने केला.

  • प्रभाकर साईल हा असा एक साक्षीदार ठरला की, त्याने एनसीबी अधिकाऱ्यांचे रॅकेट उद्ध्वस्त करून देशात खळबळ माजवली. समीर वानखेडेंचा मुखवटाच या प्रभाकरमुळे फाटला. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरण कसे बोगस आहे हे टप्प्याटप्प्याने पुराव्यांसह बाहेर काढले. त्यातला एक महत्त्वाचा साक्षीदार प्रभाकर साईल होता.

  • प्रभाकरमुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा बनावटपणा समोर आला. आता अचानक प्रभाकर साईलचा मृत्यू झाला. हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले गेले, पण मृत्यू संशयास्पद आहे असे खुद्द गृहमंत्री वळसे-पाटील यांनाच वाटत आहे व त्यांनी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या सर्व प्रकरणातला खोटारडेपणा उघड करणारे मंत्री नवाब मलिक यांना 'ईडी'ने आधीच तुरुंगात डांबले आहे. आता पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला. प्रभाकर हा क्रूझ ड्रग्ज प्रकरणातला प्रत्यक्ष साक्षीदार होता.

  • भारतीय जनता पक्षाचा अजेंडा चालविणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या विरोधात प्रभाकर साईल निर्भयपणे उभा राहिला व शेवटपर्यंत तो सत्य बोलत राहिला. केंद्रीय तपास यंत्रणांचा खेळ त्याच्या साक्षीने कोलमडून पडला. मोदी यांनीच पंतप्रधान म्हणून प्रभाकरच्या मृत्यूकडे गांभीर्याने पाहायला हवे. कोणी सरकारविरुद्ध तक्रार केली की, 'ईडी'चा ससेमिरा लावायचा, धाडींवर धाडी घालायच्या, कोणी सत्य सांगणारी साक्ष दिली की, त्याच्या जिवावर उठायचे असेच एकंदरीत दिसते.

saamana editorial shiv sena directly targeted bjp over prabhakar sails death
'प्रभाकर साईलचा मृत्यू संशयास्पद', गृहमंत्री वळसे-पाटलांकडून DGP यांना चौकशीचे आदेश
  • प्रभाकरने आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकाऱ्यांवर आठ कोटींच्या वसुलीचा आरोप लावला होता. त्यामुळे झोनल डायरेक्टर वानखेडे हे अडचणीत सापडले होते व त्यांना एनसीबीतून बाहेर जावे लागले. महाराष्ट्रातच नव्हे तर एकंदरीतच देशात जे खूनशी राजकारण सुरू आहे ते अस्वस्थ करणारे आहे.

  • प्रभाकर साईलने सत्य सांगितले नसते तर आर्यन खानप्रमाणे अनेक जण यापुढेही केंद्रीय यंत्रणांच्या मनमानीचे व खंडणीखोरीचे बळी गेले असते. प्रभाकरच्या सत्य कथनाने कित्येक आर्यन खान बळी जाण्यापासून वाचले. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण हे एक राजकीय षड्यंत्र होते. ज्या पद्धतीने भाजपचे पुढारी त्या काळात केंद्रीय यंत्रणांची कड घेऊन भांडत होते, तो सर्वच प्रकार किळसवाणा होता.

Related Stories

No stories found.