
-गणेश जाधव, उस्मानाबाद
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर गाभाऱ्यात जाण्यापासून छत्रपती संभाजीराजे यांना अडवण्यात आल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला. या प्रकरणी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यावर कारवाईची मागणीही करण्यात आली. सोमवारी रात्री 9 वाजता संभाजीराजे देवीच्या दर्शनासाठी आले असता, त्यांना गाभाऱ्यात जाण्यापासून अडवण्यात आलं होतं.
जाणून घ्या नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राची कुलस्वामिनी अशी ओळख असलेली आई तुळजाभवानी माता ही छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी आहे. त्यामुळे छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा तुळजाभवानी मातेच्या दर्शनास येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात, ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. सोमवारी रात्री 9 वाजता दरम्यान युवराज संभाजीराजे छत्रपती दर्शनासाठी आले असताना यावेळी मातेच्या गाभाऱ्यात जाण्यापासून त्यांना प्रतिबंध केला गेला.
सरकारी नियम दाखवत महाराजांना मंदिरातील गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आलं. यावेळी संभाजीराजेंनी आपल्या घराण्याची परंपरा आपल्याला पाळू द्या, अशी विनंती करून देखील त्यांना आतमध्ये प्रवेश करू दिला गेला नाही. मंदिरातीळ कंत्राटी पध्दतीने कामावर असलेल्या आणि मंदिर प्रशासनातील कर्मचारी संभाजीराजेंशी गैरवर्तन केल्याचा आरोप सकल मराठा समाजाने केला आहे. या प्रकरणातील संबंधित मंदिर तहसीलदार, व्यवस्थापक आणि धार्मिक व्यवस्थापक, जनसंपर्क अधिकारी यांना निलंबीत करावे अन्यथा राज्यभर जनआंदोलन उभारू अशी उद्विग्न भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
काय आहे तुळजापूर मंदिराच्या मालकीचा इतिहास?
छत्रपती संभाजीराजे तुळजाभवानी मातेच्या दर्शनास दरवर्षी न चुकता येत असतात. यावेळी ते परंपरेनुसार गाभाऱ्यात जाऊनच मातेचे दर्शन घेतात. यावेळी छत्रपतींच्या पुजाऱ्यांतर्फे आरती केली जाते. चार महिन्यांपूर्वी संभाजीराजे दर्शनास आले असता, त्यांनी गाभाऱ्यात जाऊनच मातेचे दर्शन घेतले होते.
तुळजापूर देवस्थान हे पूर्वापार कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या मालकीचे होते. छत्रपती संभाजीराजे यांचे आजोबा छत्रपती शहाजी महाराज यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर तुळजाभवानी मंदिर भारत सरकारच्या स्वाधीन केले होते. मात्र छत्रपती घराण्याच्या पूर्वापार पासून सुरु असलेल्या प्रथा-परंपरा आजही इथे पाळल्या जातात. दररोज भवानी मातेला पहिला नैवेद्य व अभिषेक हा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा असतो. भवानी माता निद्रा घेते तो पलंग देखील कोल्हापूरचे छत्रपती महाराज अर्पण करतात. त्याच पलंगावर भवानी माता निद्रा घेते. मंदिराच्या देखभालीसाठी छत्रपती घराण्याने शेकडो एकर जमीन दान दिली आहे असे असतानाही त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे मराठा समाजातर्फे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
तुळजापूर हा भाग पूर्वी हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता. त्यावेळी सुद्धा भवानी माता छत्रपती घराण्याची कुलदेवता असल्यामुळे निजामाने इथे कधीही हस्तक्षेप केला नाही. ब्रिटिशांच्या काळातही इथे हस्तक्षेप झाला नाही किंवा कोणतेही नियम छत्रपती घराण्यावर लादण्यात आले नाहीत. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व तुळजापूर तहसीलदार व्यवस्थापक यांनी गाभाऱ्यात जाण्यास बंदी करणे हा नियम जरी योग्य असला तरी छत्रपती घराण्याला त्यातून वगळणे गरजेचे होते. महाराष्ट्रातील कोणत्याही मंदिरात छत्रपतींना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले जात नाही, ही परंपरा आहे. निजामाने आणि इंग्रजानी देखील या परंपरामध्ये हस्तक्षेप करण्याचे धाडस केले नाही त्या परंपरा हे सरकार व प्रशासन मोडू पाहत आहे असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला.
मंदिर प्रशासनाची प्रतिक्रीया -
छत्रपती संभाजी राजे यांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू किंवा तशी कृती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मंदिर संस्थानला करवीर संस्थानच्या रोजच्या अभिषेक व्यतिरिक्त का मुर्तीजवळ थांबता आलेले नाही याचे कारण देऊळ कवायत कलम ३६ नुसार कुळाचार विधी व्यतिरिक्त कमाविसदार पुजारी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नाही हे होते. तरीही सर्व VVIP यांना सिंहासनापासून ५ फुटांवर नेहमी प्रमाणे दर्शन व आरती केली जाते. या नियमांच्या अंमलबजावणीसाठी हाय कोर्टामध्ये मंदिर संस्थानवर केस सुरू आहे. तसेच कलम ३६ ची अंमलबजावणी होत असल्याने भाविकांना अगदी दर्शन मंडपातून सुद्धा देवीचे दर्शन घेता येते.
करवीर संस्थांनची मानाची पूजा संभाजी राजे छत्रपती यांच्या आगमनापूर्वी झालेली होती. यानंतर जेव्हाही ते दर्शनाला येणार असतील तेव्हा करवीर संस्थानचा अभिषेक त्यांचे आगमन पाहून करावे जेणेकरून त्यांचे हस्ते दुग्ध अभिषेक होईल अशा सूचनाही आम्ही दिल्या आहेत. त्यामुळे कायदेशीर अडचण न येता त्यांच्या दौऱ्याच्या वेळी आगमन वेळेत करवीर संस्थान पूजा दुग्ध अभिषेक व नैमित्तिक विधी करण्याचे नियोजन करवीर संस्थान प्रतिनिधी आणि तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापक समन्वयाने करतील अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. करवीर संस्थान हे तुळजाभवानी मंदिराचे मानकरी असून त्यांचा मान ठेवणे हे मंदिर संस्थानचे कर्तव्य आहे. याबाबत कृपया कोणीही चुकीची माहिती प्रसारित करू नये.