Sameer Wankhede: समीर वानखेडेंना हटवलं की नाही? एनसीबीने काय म्हटलं?

NCB Letter about Sameer Wankhede: समीर वानखेडे यांना मुंबईच्या झोनल डायरेक्टर पदावरुन हटविण्यात आलं आहे असा अनेक जण दावा करत होते. पाहा याबाबत NCB ने आता नेमकं काय म्हटलंय.
Sameer Wankhede: समीर वानखेडेंना हटवलं की नाही? एनसीबीने काय म्हटलं?
Sameer Wankhede remove or not from ncb mumbai zone What did the NCB say(फाइल फोटो)

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणाच्या तपासातून हटवण्यात आलं की नाही यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांनी वेगवेगळे दावे केले आहेत. अशातच आता खुद्द एनसीबीनंही एक खुलासेवजा निवेदन जारी केलं आहे. त्यामुळे नेमका कोणाचा काय दावा आहे हे जाणून घेऊयात सविस्तरपणे.

शुक्रवारी 5 नोव्हेंबरला संध्याकाळी एक बातमी समोर आली. त्यानुसार, समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणासह 6 बहुचर्चित केसेसचा तपास काढून घेण्यात आला. त्यांना तपासातून वगळण्यात आलं. कॅबिनेटमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनीही ट्विट करून वानखेडेंना हटवण्यात आल्याचा दावा केला.

नवाब मलिक लिहितात, 'आर्यन खानसह 5 प्रकरणांच्या तपासातून समीर वानखेडे यांना हटवण्यात आलं आहे. अजून 26 प्रकरणं आहेत, ज्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. ही तर फक्त सुरवात आहे, ही यंत्रणा सुधारण्यासाठी खूप काही करणं गरजेचं आहे आणि आम्ही ते करु.'

दरम्यान, दुसरीकडे समीर वानखेडे यांनीही मलिकांच्या या ट्विटनंतर काही वेळातच या संपूर्ण घडामोडीबद्दल 'मुंबई तक'शी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,

'मी मुंबई एनसीबीचा झोनल डायरेक्टर आहे, यापुढेही असणार आहे. माझ्याकडून हे पद काढून घेण्यात आलं नाही. आर्यन खान प्रकरणी माझ्यावर नवाब मलिक यांनी आरोप केले होते. त्यामुळे त्या आरोपांची आणि आर्यन खान प्रकरणाची चौकशी SIT कडून करावी, असं मीदेखील सुचवलं होतं. त्यामुळे आता हे प्रकरण माझ्याकडून काढून घेतलं, हे एक प्रकारे बरंच झालं.'

'मी ड्रग्ज प्रकरणात ज्या काही खास मोहिमा असतील त्या राबवत राहणार. मला दिल्लीत बोलवण्यात आलं नाही. मात्र मला या केसमधून वेगळं करण्यासाठीची ऑर्डर मला मिळाली आहे.' असं समीर वानखेडे म्हणाले.

पण समीर वानखेडेंच्या याच दाव्यावर मलिकांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी यावेळी असं म्हटलं आहे की, 'एकतर ANI (वृत्तसंस्था) समीर वानखेडे यांचं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रसारित करत आहे किंवा समीर वानखेडे देशाची दिशाभूल करताहेत. त्यांनी कोर्टात रिट याचिका दाखल करुन जबरदस्तीने वसुली आणि भष्ट्राचाराशी संबंधित जे आरोप लावण्यात आलेत, त्याची चौकशी सीबीआय (CBI) किंवा एनआयएकडून (NIA) करण्यात यावी, मुंबई पोलिसांकडून नाही अशी मागणी केली होती. पण कोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली. देशाला सत्य समजलं पाहिजे', असं ट्विट नवाब मलिकांनी केलं आहे.

मलिक यांच्या म्हणण्यानुसार, समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणाचा नाही, तर स्वतःवरील आरोपांचा तपास मुंबई पोलिसांनी न करता कोणत्यातरी केंद्रीय एजन्सीमार्फत करावा, अशी विनंती कोर्टात केली होती. पण कोर्टानं ही मागणी आधीच फेटाळली आहे.

याच सगळ्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उशीरा एनसीबीकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलं. पण यामध्ये समीर वानखेडे किंवा कोणाच्याही नावाचा उल्लेख नाही.

एनसीबीचे उपमहासंचालक संजय कुमार सिंह यांनी काढलेल्या या परिपत्रकानुसार, एनसीबी डायरेक्टरच्या निर्देशानुसार एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. सध्या मुंबई एनसीबीकडे असलेल्या सहा प्रकरणांचा तपास ही एसआयटी करेल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लिंकची यात चौकशी केली जाणार आहे. कोणत्याही अधिकाऱ्याला पोस्टवरुन हटवण्यात आलं नाही. ते या ऑपरेशन ब्रांचला गरजेनुसार सहकार्य करत राहतील.

समीर वानखेडे यांच्यासंदर्भात हटवण्याच्या ज्या चर्चा सुरू झाल्यात त्या सर्व चर्चा एनसीबीने फेटाळून लावल्या आहेत. एनसीबीच्या परिपत्रकात हटवलं नसल्याचं सांगण्यासाठी REMOVED शब्द कॅपिटल लेटरमध्ये लिहिण्यात आला आहे.

Sameer Wankhede remove or  not from ncb mumbai zone What did the NCB say
Aryan Khan Drugs Case: 'वानखेडे तुम्ही दिशाभूल करत आहात', नवाब मलिकांचा पुन्हा एकदा वानखेडेंवर हल्लाबोल

समीर वानखडे हे सध्या मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर आहेत आणि ते याच पदावर कायम राहणार असल्याचं एनसीबीच्या परिपत्रकावरून स्पष्ट झालं आहे. मात्र आर्यन खान, नवाब मलिकांचे जावई समीर खान यांच्याशी संबंधीत प्रकरणांसोबतच एकूण 6 प्रकरणांचा तपास मात्र वानखेडेंकडून काढून घेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in