'पुण्यात येऊन आम्हाला ज्ञान देऊ नका'; अमित शाहांना संजय राऊतांनी दिलं प्रतिआव्हान

Sanjay Raut vs Amit Shah : "पुण्यात येऊन आम्हाला ज्ञान देऊ नका. आम्ही तुमचा आदर करतो. तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा, आम्ही आमच्या मर्यादेत राहतो"
'पुण्यात येऊन आम्हाला ज्ञान देऊ नका'; अमित शाहांना संजय राऊतांनी दिलं प्रतिआव्हान
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह.Aajtak

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी शिवसेनेवर टीकेची तोफ डागली. सत्तेच्या वाटपावरून तुटलेल्या युतीबद्दल बोलताना अमित शाह यांनी खुलासा करत उद्धव ठाकरे यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं. शाह यांनी केलेल्या भाषणावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भूमिका मांडत प्रतिआव्हान दिलं. 'शाह यांनी खोटं बोलू नये आणि छत्रपती शिवरायांच्या पुण्यात तर बोलूच नये', असं म्हणत राऊत यांनी भाजपचं 105 आमदार पुन्हा निवडून आणून दाखवा असं आव्हान दिलं.

दिल्लीत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "अमित शाह काल पुण्यात आले आणि त्यांनी केलेलं वक्तव्य पूर्णपणे असत्याला धरून आहे. अमित शाह यांच्या कालच्या संपूर्ण भाषणात ते नक्की खरं काय बोलले हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या सरकारविषयी, आमच्या भूमिकांविषयी, आमच्या हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला दोन अडीच वर्षांपासून भ्रमीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीही जनता विश्वास ठेवायला तयार नाही, हे वैफल्य मी राज्यातील नेत्याकडे पाहतोय. आता त्यांचे सर्वोच्च केंद्रीय नेते सुद्धा त्याच वैफल्यातून महाराष्ट्रात येऊन बोलू लागले आहेत. हे जेव्हा मी काल पाहिले, तेव्हा मी असो, उद्धव ठाकरे असो वा महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असो... आम्हा सगळ्यांना द्या आली आणि आश्चर्यही वाटलं", असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह.
'हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि...' अमित शाह यांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

"हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेनं सोडला नाही, सोडणार नाही. 2014 साली फक्त सत्तेसाठी शिवसेनेला दूर करा असं राज्यातील भाजपच्या नेत्यांना खासगीत सांगणारे कोण होते? हे अमित शाह यांनी स्पष्ट करावं. ते वेगळं लढून दाखवा असंही म्हणाले. 2014 साली आम्ही वेगळंच लढलो होतो. आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढलो आणि चांगला विजयही मिळवला", असं राऊत म्हणाले.

"2014 पासून हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात करणारे कोण आहेत? याचं उत्तर त्यांनी द्यावं. महाराष्ट्रातील संपूर्ण सत्ता काबीज करण्यासाठी हिंदुत्वावादी पक्षाला दूर ठेवण्याची कटकारस्थान कुणी केली? याची उत्तरं त्यांनी द्यावीत. पुण्यात जमत नसेल, तर दिल्लीत उत्तर द्यावं. महाराष्ट्रातील सरकार उत्तम चाललं आहे. केंद्राने प्रयत्न करून एक कवचा सुद्धा उडालेला नाही. याचं दुःख आम्ही समजू शकतो. सीबीआय, ईडी, एनसीबी ही तीन चिलखतं घालून ते महाराष्ट्रात फिरताहेत. ही चिलखतं घालून कुरघोडी घालण्याचा प्रयत्न करता आहात, ही चिलखतं काढून ठेवा आणि आमच्याशी लढा. आम्ही छातीवर वार घेणारे आहोत. आम्ही पाठीमागून प्रतिहल्ले करत नाही. शिवसेनेवाले छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद आहे. आम्ही समोरूनच लढतो. आतापर्यंत समोरूनच लढत आलेलो आहोत", असं उत्तर राऊत यांनी शाह यांना दिलं.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह.
ठाकरे सरकारने नीट ऐकलं नाही, पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त केली; अमित शाह यांचा टोला

"हे आता आपल्याला दोन वर्षानंतर आठवलंय का? वरळीत पुनश्च हरिओम करण्याचं ठरलं होतं. वरळीतील सी ब्लू हॉटेलमध्ये दोघांमध्ये एक सोहळा पार पडला. तिथे सगळ्या माध्यमांचे प्रतिनिधी होते. तिथे सत्तेचं वाट 50-50 असा शब्द वापरण्यात आला होता. याचा अर्थ काय होतो. पावर शेअरिंग म्हणजे पावर ब्रोकिंग नाही, हे आम्ही तुमच्यासारख्या लोकांना सांगायला नको. सत्तेचं वाटप 50-50 होतं. त्यात मुख्यमंत्री पदही होतं. खोटं बोलू नका आणि पुण्यात तर बोलूच नका, कारण ती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. तिथे शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवलेला आहे. देशाच्या गृहमंत्र्यांना देशामध्ये काम नसेल, तर त्यांनी आम्हाला सांगावं. कर्नाटकात शिवरायांचा अपमान होतोय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तुमच्या राज्यात निर्माण होतोय. पुण्यात येऊन आम्हाला ज्ञान देऊ नका. आम्ही तुमचा आदर करतो. तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा, आम्ही आमच्या मर्यादेत राहतो", अशी टीका राऊत यांनी शाह यांच्यावर केली.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह.
महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांची पंक्चर रिक्षा, फक्त धूर निघतो -अमित शाह

"आपण सुद्धा हिंमत असेल, तर 105 आमदारांनी राजीनामा द्यावा. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय तुमचे 105 आमदार निवडून येणं शक्य नव्हतं. 105 आमदारांनी राजीनामा द्यावा आणि परत 105 आमदार निवडून आणून दाखवावेत हे आमचं आव्हान आहे", असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी भाजपलाच आव्हान दिलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in