'संजय राऊत ठाकरे-पवार पॅटर्न विसरले, त्यांचा आता गांधी पॅटर्न'

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
'संजय राऊत  ठाकरे-पवार पॅटर्न विसरले, त्यांचा आता गांधी पॅटर्न'

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सध्या गांधी पॅटर्न सुरू आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचेच गोडवे ते हल्ली गात असतात. ठाकरे-पवार पॅटर्न विसरले आहेत. संजय राऊत यांचा आता नवीन पॅटर्न सुरू झाला आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

अनंत गीते आणि रामदास कदम यांना शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात नो एंट्री आहे असं कळतं आहे याबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले की त्यांचा पक्ष आहे कुणला एंट्री द्यायची कुणाला नाही ते त्यांनी ठरवायचं आहे. मात्र एक खरं आहे की जे खरं बोलतात त्यांना नो एंट्री आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेलाही सुनावलं आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यामध्ये दोन व्यक्तींचा प्रामुख्याने मोठा सहभाग होता. एक होते शरद पवार आणि दुसरे होते संजय राऊत. संजय राऊत यांनी सातत्याने हे सांगितलं की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आणि तेच झालं. 2019 मध्ये जे सत्तानाट्य चाललं होतं ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. ठाकरे-पवार हा पॅटर्न खरंतर तोपर्यंत महाराष्ट्राला अशक्य वाटत होता. मात्र हा पॅटर्न संजय राऊत यांनी प्रत्यक्षात आणून दाखवला. आता मात्र त्यांना या पॅटर्नचा विसर पडला आहे अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली

महाविकास आघाडी
महाविकास आघाडीफोटो-इंडिया टुडे

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

शरद पवार इतक्या वेगवेगळ्या विषयांवर बोलले की कळलंच नाही पत्रकार परिषद कशाबाबत होती. शरद पवार यांनी लखीमपूरच्या घटनेचा उल्लेख केला. केंद्र सरकारवर टीका केली आणि मावळचा गोळीबार पोलिसांनी केला होता असं वक्तव्य केलं. मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो जालियनवाला बागमध्ये गोळीबार कऱण्यासाठी ब्रिटिशांचे गव्हर्नर जनरल गेले नव्हते तर पोलीसच गेले होते. त्यामुळे मावळचा गोळीबार हा जालियनवालाबागसारखा होता असं आम्ही म्हणतो कारण तिथे राज्यकर्त्यांना जायची गरज नव्हती. आदेश कुणी दिले पोलिसांना?

सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की उत्तर प्रदेशात जी घटना घडते त्यासाठी इथे तुम्ही बंद करता. इथे तुम्ही धुडगूस घालता, इथे हिंसा होते. पहिल्यांदा मी असं पाहिलं की पोलीस संरक्षणामध्ये राज्यकर्ते लोकांवर दबाव टाकत आहेत, त्यांना बंद करायला भाग पाडत आहेत. हे कुठलं राज्य आहे असा प्रश्न पडला. शिवसेना असूनही शांततेतही बंद झाला असं पवारांनीच सांगितलं ही समाधानाची गोष्ट आहे असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. रोज सोशल मीडियावर जे व्हीडिओ येत आहेत त्यावरून समजतंच आहे की बंद किती शांततेत पार पडला. हा स्टेट स्पॉन्सर्ड बंद होता असं माझं मत आहे.

अनिल देशमुख यांच्यावर जी कारवाई झाली ती माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली आहे. हायकोर्टाने यासंदर्भात सीबीआय चौकशीचा निर्णय दिला आहे. ज्यांनी महाराष्ट्राचे आणि देशाचे पैसे बुडवले अशी 80 बँक फ्रॉडची प्रकरणही सीबीआयला महाराष्ट्राने संमती न दिल्याने धूळ खात पडून आहेत. ज्या प्रकारे या ठिकाणी या संस्थाना वागणूक दिली जाते आहे ती देखील चुकीची आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in